Pune Crime : दारु पिताना बायकोला अश्लील बोलला अन् मित्राने पुलावरून ढकलून जीव घेतला, लपवलेल्या खुनाचा सहा महिन्यांनी उलघडा
दिनेश कांबळे गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गायब झालेली तारीख आणि दाखल झालेल्या तक्रारीत मोठी तफावत असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.
पिंपरी चिंचवड : मित्रासोबत दारु पिताना त्याच्या पत्नीविषयी अश्लील शब्द बोलल्याने पुलावरून ढकलून देत हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pune Crime) उघडकीस आली आहे. तब्बल सहा महिन्यांनी या हत्याकांडाला वाचा फुटली आहे. वाकड पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सिद्धांत रतन पाचपिंडे आणि प्रतीक रमेश सरवदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनेश दशरथ कांबळे (वय 26, रा. एकता काॅलनी, बापुजी बुवा नगर, थेरगाव, पुणे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दिनेश हा सहा महिन्यापासून बेपत्ता होता. त्याच्या आई वडिलांनी वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर या हत्येचे गूढ सहा महिन्यांनंतर उलगडले आहे.
सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता असल्याची तक्रार
दिनेश कांबळे गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गायब झालेली तारीख आणि दाखल झालेल्या तक्रारीत मोठी तफावत असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. प्रकरणाचा तपास सुरु असतानाच गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिनेशचे मित्र ज्ञानेश्वर मोटे व श्रवण मोटे (दोघे रा. अशोका सोसायटी, रुम नं. २१, थेरगाव, पुणे) यांचेकडे चौकशी केली. त्यानुसार 15 मार्च रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास काळेवाडी फाटा शेजारी ग्राऊंडवर दिनेश मित्र सिध्दांत पाचपिंडे व प्रतीक सरवदेसोबत दारु पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी भांडण झाल्याची माहिती मिळाली. परंतु, दिनेशचा काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे सिध्दांत आणि प्रतिकला तांत्रिक तपासाद्वारे ताब्यात घेत चौकशी करण्यात आली.
नाशिक फाटा ब्रिजवरून दिनेशला खाली फेकून दिले
चौकशीत दोघांनी 15 मार्च रोजी दिनेश सोबत असल्याचे सांगितले. तिघांनी सुरवातीस पिंपरीमध्ये दारु पिल्यानंतर अॅक्सेस मोपेडवरुन तिघेही काळेवाडी फायटानजीक मोकळ्या मैदानात पुन्हा दारु पिणेस बसले. त्यावेळी दिनेशने प्रतिकच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरल्याने भांडण सुरु झाले. या भांडणात प्रतिक व सिध्दांतने दिनेशच्या डोक्यात सिमेंटचा दगड मारून जखमी करून फरार झाले. परंतु, पुन्हा दोन तासांनी त्याच ठिकाणी परत येऊन जखमी दिनेशला अॅक्सेसवर बसवून औंधनंतर दापोडीत दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कासारवाडीत नाशिक फाटा ब्रिजवरून दिनेशला खाली फेकून दिले. या घटनेत दिनेशचा मृत्यू झाला. जुन्या पुणे मुंबई रोडवर मयत अवस्थेत आढळून आल्यानंतर बेवारस व्यक्तीचा अपघाताची केस भोसरी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर भोसरी पोलिसांनी तपास करत लपवण्यात आलेल्या खून प्रकरणाचा उलघडा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या