(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune ganeshotsav 2023 : अजिबात हुशारी करु नका! गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 7 हजार पोलीस तैनात, साध्या वेशातील पोलिसांची गस्त
गणेशोत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सात हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पुणे पोलिसांनी संभाव्य दहशतवादी हल्ले आणि अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
पुणे : गणेशोत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था (Pune ganeshotsav 2023) राखण्यासाठी 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पुणे पोलिसांनी संभाव्य दहशतवादी हल्ले आणि अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. समृद्ध इतिहास असलेल्या गणेशोत्सवाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत असून उत्सवादरम्यान शहर आणि उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
उत्सवादरम्यान, राज्य आणि देशाच्या इतर भागातून अनेक पर्यटक शहराला भेट देतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मोबाईल, दागिने चोरीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
कसा असेल फौज फाटा?
पोलिस आयुक्तालयातील पाच हजार पोलिस, अधिकारी, क्विक रिस्पॉन्स टीम, गुन्हे शाखेचे पथक, पुण्याबाहेरून आलेले 1300 व पोलिस कर्मचारी, होमगार्डचे एक हजार जवान, सीआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात असतील. उत्सव काळात पोलीस मित्र मदत करणार आहेत.पूज्य गणपती मंडळांजवळील गर्दीची ठिकाणे बॉम्बशोधक पथकाद्वारे तपासली जातील. प्रशिक्षित श्वान आणि पोलिस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणी तपासणी करणार आहेत.
गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,800 सीसीटीव्ही तैनात
उत्सवादरम्यान गर्दीवर 1,800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे पोलिसांनी नुकतीच कोथरूड परिसरातून दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. उत्सवादरम्यान दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दोन दहशतवादी सापडल्याच्या पार्श्वभूमीवर शहर हाय अलर्टवर
काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन दहशतवादी सापडले होते. कोथरुडसारख्या परिसरात चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोघांचा संपर्क ISIS सारख्या देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता बंदूक आणि स्फोटकं आढळली होती. त्यानंतर बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि क्रिया लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात हे दोघं राहत होते. त्यानंतर पुण्यातील कोंढवा परिसरातूनच एका भूलतज्ञ असणाऱ्या डॉक्टरला ISIS मध्ये भरती करुन घेतो या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे यंदा कडेकोट बंदोबस्त कऱण्यात येणार आहे.
इतर महत्वाची बातमी-