Pune Crime: पोलिसांना पाहिलं अन् घाबरला! 'तो' पॅंटच्या खिशात काहीतरी लपवताना दिसला, पोलिसांकडून लाखोंच्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
Pune Crime News: पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशातून पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल मिळाले.
पुणे: पुणे पोलिसांनी (Pune Police) बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतून आणलेल्या तब्बल साडेदहा लाखांच्या बनावट नोटा पुणे पोलिसांनी (Pune Police) जप्त केल्या आहेत. बनावट नोटप्रकरणी दिल्ली सह, गाझियाबाद आणि मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी (Pune Police) अटक केली असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या 10 लाख 35 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Police)
पोलिसांना पाहून तो पळाला अन्...
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एकजण स्वारगेटच्या दिशेने पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशातून पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल मिळाले. रात्री अंधारात तो बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्नात होता. त्याला शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे सांगितले. पोलिसांनी वीरकरला नवी मुंबई येथे नेत तिथून शाहीदला अटक केली. चौकशीत अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली.
10 लाख 35 हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त
अटक केलेल्या आरोपींकडून 10 लाख 35 हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. तर नीलेश हिरानंद विरकर (33, रा. चिंचवड), शाहीद कुरेशी (25), सैफान पटेल (26), अफजल शहा ( 19, सर्व रा. नवी मुंबई), शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अन्सारी (22, रा. पालघर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तो पॅंटच्या खिशात काहीतरी लपवताना दिसला
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिसांचे पथक परिसरात गस्त घातल होते. त्यावेळी पोलिसांना पाहून नीलेश हा गडबडीने स्वारगेटकडे जाताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना दिसला. संशय आल्याने पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. चौकशीवेळी तो पॅंटच्या खिशात काहीतरी लपवताना दिसला. त्यावेळी 500 रुपयांच्या नोटांचे बंडल पोलिसांना आढळले. त्याच्याकडून अशा 250 नोटा जप्त केल्या. या नोटा त्याने कोपरखैरणे शाहीद, सैफान आणि अफजलकडून घेतल्या होत्या. या तिघांना पोलिसांनी अटक केली. तेव्हा चौकशीत आरोपी अंसारचे नाव पुढे आले. त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व 2 हजार 70 नकली नोटा बाजारात आल्या असत्या तर त्यांची किंमत सुमारे 10 लाख 35 हजार रुपये झाली असती.