Rahul Gandhi: राहुल गांधीच्या अडचणी वाढणार? राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, 'ते' वक्तव्य भोवणार?
Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले आहेत. कलम 204 अन्वये हे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मार्च 2023 मध्ये लंडन मध्ये एका भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. सात्यकी सावरकर यांनी दाखल तक्रार करण्यासाठी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयात धाव घेतली होती. (Pune court asks Rahul Gandhi to appear on August 19 in Savarkar defamation case)
सावरकरांचा अपमान केल्याचा राहुल यांच्यावर आरोप
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याबाबत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पुण्यातील विश्रामबाग पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
राहुल गांधींनी काय म्हटलं होतं?
तक्रारीनुसार, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाषणात म्हटलं की, सावरकरांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, मी माझ्या 5-6 मित्रांसोबत जात एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती. अशा केल्यानं मला आनंद झाला होता. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे खंडन केले होते. दरम्यान, राहुल गांधी आता पुणे सत्र न्यायालयात हजर होणार आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.