Pune news : फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषदेच्या 6000 हरकतींवर सोमवारपासून सुनावणी
पुणे महापालिकेकडून फुरसुंगी आणि उरुळी देवाची यांच्या विलगीकरणाला आक्षेप घेणाऱ्या नागरिकांचे 6,000 अर्ज पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.
![Pune news : फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषदेच्या 6000 हरकतींवर सोमवारपासून सुनावणी Pune Collector office gets over 6 thousand application objecting demerger of Phursungi and Uruli Devachi from PMC Pune news : फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषदेच्या 6000 हरकतींवर सोमवारपासून सुनावणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/87211506c1ace8df97a3141c2f05e5421683716112051442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune news : पुणे महापालिकेकडून फुरसुंगी आणि उरुळी देवाची यांच्या विलगीकरणाला आक्षेप घेणाऱ्या नागरिकांचे 6,000 अर्ज पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. या अर्जांवर सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र नगरपरिषद करण्यासाठी ही दोन गावे पुणे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता. या प्रक्रियेनंतर अधिसूचना जारी करण्यात आली आणि यावर्षी मार्चमध्ये नागरिकांना हरकती मांडण्याची मुभा देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नागरिकांकडून सुमारे 6,500 हरकती प्राप्त झाल्या आहेत.
प्राप्त झालेल्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. या अधिकार्यांकडून संकलित केलेला अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला जाईल, त्यानंतर ते राज्य सरकारला सादर करतील. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेईल. या संपूर्ण प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी 2017 मध्ये ही दोन्ही गावे पुणे महापालिकेत विलीन झाली होती. स्थानिक रहिवासी आणि परिसरातील राजकीय नेत्यांनी सरकारला ते पीएमसीमधून बाहेर काढण्याची विनंती केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ते महापालिकेतून बाहेर काढण्याची घोषणा केली होती.
विजय शिवतारेंच्या मागणीला यश
पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे. महापालिकेत समावेश केल्यानंतर या दोन्ही गावांच्या विकासाकामांना वेग आला होता. मात्र महापालिकेत समावेश करुनही पायाभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या गावासाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
पुणे महानगरपालिकेची सुधारित हद्द
उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुल गावांची हद्द.
उत्तर पूर्व – लोहगाव, वाघोली या महसुल गावांची हद्द.
पूर्व – मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसूली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द.
दक्षिण पूर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसूली गावांची हद्द व उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द.
दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसूली गावांची हद्द.
दक्षिण-पश्चिम – पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसुली गावांची हद्द.
पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बु. व खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसुली गावांची हद्द.
पश्चिम-उत्तर – बाणेर, बालेवाडी या महसुली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)