पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
सिमेंटच्या रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरली अन् महिला खाली कोसळली, त्याचवेळी मागून आलेलं अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली दबल्यानं महिलेचा मृत्यू झाला.

पुणे : पावसाळा आला की रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी भरले जाऊन अपघाताच्या विविध घटना घडतात. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये अपघाताच्या घडलेल्या घटनांमुळे महापालिकेत मोठं रणकंदन माजलं होतं. त्यानंतर, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये जाऊन आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या. तर, आज ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा अपघातामुळे एका आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानाचा जीव गेल्याची दु:खद घटना घडली. या घटनेनंतर आता पुण्यातील (Pune) चाकण एमआयडीसीत रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघात (Accident) होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
पुण्यातील चाकण एमआयडीसीत एका अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिमेंटच्या रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरली अन् महिला खाली कोसळली, त्याचवेळी मागून आलेलं अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली दबल्यानं महिलेचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला आहे. चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेची ओळख सानवी पांचाळ (42 वर्षे) अशी होत असून त्या भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये राहणाऱ्या सानवी स्कोडा कंपनीत सिक्युरिटी म्हणून कार्यरत होत्या. आपली आजची ड्युटी संपवून घरी निघाल्या असता त्यांचा अपघात झाला. सकाळपासून पाऊस सुरु असल्यानं चाकण MIDC मधील अंतर्गत सिमेंटच्या रस्त्यावर चिखल झाला होता, त्यामुळं रस्ता निसरडा झाला होता. याचं मार्गावरून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घरी निघालेल्या सानवी यांची दुचाकी घसरली, गाडीचा तोल गेला अन् त्या रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी एक अवजड वाहन मागून येत होतं. काही कळायच्या आत सानवी अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली आल्या, या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दीड हजार कंपन्या, लाखो कर्मचारी
दरम्यान, अपघातानंतर चालक अवजड वाहनासह पसार झालाय, चाकण पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर चाकण आणि MIDC अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकतर इथल्या मार्गावर खड्डयांनी साम्राज्य केलंय तर जिथं म्हणायला चांगले रस्ते आहेत, ते चिखलामुळं निसरडे झाले आहेत. पाच फेजमध्ये विस्तारलेल्या चाकण MIDC मध्ये जगातील नामांकित कंपन्यांसह जवळपास दीड हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये रोज दहा लाखांहून अधिक कर्मचारी ये जा करतात. पण इथल्या रस्त्यांची अवस्था पाहता, त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सानवी यांच्याप्रमाणे अनेकांचे जीव याआधी ही गेलेत, अनेक कामगार जायबंदी ही झाले आहेत. सरकारच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या चाकण MIDC मध्ये प्रशासन मूलभूत सुविधा पुरवू शकत, ही मोठी शोकांतिका आहे. आता, आणखी कोणाचा जीव जाण्याआधी सरकार आणि प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..























