Pune By poll Voting Live Updates : पुणेकरांचा मतदानाला अल्प प्रतिसाद! पाच वाजेपर्यंत कसब्यात 45.25 टक्के तर चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदान
पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे.
LIVE
Background
Pune Bypoll Election Voting Live Updates : पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे तर कसबामध्ये दुहेरी लढत होत आहे. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेते भाजपच्या उमेदावाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
कसबामध्ये पावने तीन लाख तर चिंचवडमध्ये साडेपाच लाखाहून अधिक मतदार
270 मतदान केंद्रांवर कसबा मतदारसंघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर चिंचवडमध्ये या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. दरम्यान, आज पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पुणेकरांची मतदानाला पाठ; कसब्यात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के तर 41.1 टक्के मतदान
कसबा विधानसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान पार पडलं तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 41.1 टक्के मतदान पार पडलं. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 या वेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 या वेळेत 10.45 टक्के. 11 ते 1 या वेळेत 20.68 तर 1 ते 3 या वेळेत 30.55 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 या वेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 या वेळेत 18.50 तर 1 ते 3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान सकाळपासूनच अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळालं
खासदार गिरीश बापट आजारी असूनही मतदानासाठी हजर
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या अहिल्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी कसब्यावर राज्य केलं आहे.
कसब्यात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 30.05 टक्के मतदान
कसबा विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या एकूण 30.05 टक्के मतदान झालं.
चिंचवडमध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 30.55 टक्के मतदान
चिंचवड विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या एकूण 30.55 टक्के मतदान झालं.
गणेश बिडकर मतदारांना पैसे वाटत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केलाय. सोमवार पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या इतर कार्यकर्त्यांसह पैशांच वाटप करत असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते तिथे पोहचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधे झटापट देखील झाली असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांच म्हणनय. या व्हिडीओ मधे गणेश बिडकर कॉंग्रेस कार्यकर्त्यावर धावून जाताना दिसतायत. त्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यात पोहचलेत.