Pune Bypoll election : भाजप-कॉंग्रेसकडून मनसेची मनधरणी करण्याचा प्रयत्न; धंगेकरांची प्रचारयात्रा थेट कार्यालयात तर चंद्रकांत पाटलांनी घेतली भोकरेंची भेट
एकीकडे मनसेने भाजपला पाठिंबा दिला असला आणि प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असला तरीदेखील कॉंग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे नेते मनसेच्या स्थानिक नेत्यांची भेट घेताना दिसत आहे.
Pune Bypoll election : एकीकडे मनसेने (Pune Bypoll Election) भाजपला पाठिंबा दिला असला आणि प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असला तरीदेखील कॉंग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे नेते मनसेच्या स्थानिक नेत्यांची भेट घेताना दिसत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची प्रचार यात्रा थेट मनसेच्या कार्यालयात धडकली होती. तर भाजप नेते चंद्रकांत पाटलांंनी कसब्याचे मनसेचे कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे यांनी भेट घेतली आहे. एरवी मनसे पक्षाला फारसं महत्व न देणारे पक्षही कसबा पोटनिवडणुकीसाठी मनसेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
धंगेकरांची पदयात्रा मनसेच्या दारात
पुण्यातील कसबा मतदार संघाच्या निवडणुकीत मोठे ट्विस्ट बघायला मिळत आहे. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रंविद्र धंगेकरांची प्रचारयात्रा थेट मनसेच्या कार्यालयात धडकली होती. त्यांनंतर मनसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचं जय्यत स्वागत केलं. मनसेनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या केलेल्या स्वागताची चांगलीच चर्चा झाली. अनेक तर्कवितर्क लावण्यात आहे.
धंगेकरांच्या स्वागतानंतर मनसेकडून स्पष्टीकरण
प्रसिद्धीपत्रात लिहिलंय की, काल पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे दोन मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत.राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात श्रीमती अश्विनीताई जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये,असं स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आलं आहे.
चंद्रकांत पाटलांनी घेतली भोकरेंची भेट
त्याच प्रमाणे भाजपदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्यांना प्राचारात उतरण्याचं आवाहन भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली आहे.