पुणे आणि पिंपरीतील आयनॉक्स, पीव्हीआरमध्ये समोस्यावर बंदी, प्रचंड अस्वच्छतेमुळे एफडीएचा निर्णय
मे. एम. के. एंटरप्राइजेस कारखान्यात तयार होणारे समोसे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि विशाल ई-स्क्वेअर या नामांकित सिनेमागृहात विकले जात होते.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सिनेमागृहात समोसे पुरवणाऱ्या मे. एम. के. एंटरप्राइजेस या उत्पादकाला समोसे तयार करण्यावर व विक्री करण्यावर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली. समोसे तयार होत असलेल्या कारखान्यात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
खराळवाडी, पिंपरी येथील समोसा उत्पादक कारखाना मे. एम.के. एंटरप्राइजेस यांचा उत्पादन व विक्रीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले. या कारखान्यात तयार होणारे समोसे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि विशाल ई-स्क्वेअर या नामांकित सिनेमागृहात विकले जात होते.
ज्या ठिकाणी हे समोसे तयार केले जात होते, तेथे अत्यंत अस्वच्छता असल्याचं दिसून आलं आहे. समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणार पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची तपासणी देखील आतापर्यंत करण्यात आली नव्हती. तसेच काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नव्हती. महत्त्वाची बाब म्हणजे समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तेल तीन ते चार वेळा वापरण्यात येत होते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.