(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांचा प्लॅटफॉर्म बदलला; निरा स्थानकावर प्रवाशांचे हाल
Pune News : मिरज रेल्वेमार्गावरील नीरा रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पूर्वीच्या प्लॅटफॉर्मवर न थांबता प्लॅटफॉर्म नसलेल्या तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबतात. परिणामी प्रवाशांंची गैरसोयी होत असुन प्रवाशांचे हाल होत आहेत.
Pune News : मिरज रेल्वेमार्गावरील नीरा रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पूर्वीच्या प्लॅटफॉर्मवर न थांबता प्लॅटफॉर्म नसलेल्या तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबतात. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नीरा रेल्वेस्थानकावर पूर्वीप्रमाणेच जुन्याच प्लॅटफॉर्मवरच गाड्या थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवाशांतून होत आहे. तीन नंबर लाइनवर प्लॅटफॉर्म नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वयोवृद्ध नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
प्रवाशांची गैरसोय
पुरंदर तालुक्यातील नीरा स्थानकातून पुणे, मुंबई, अहमदनगर, नागपूरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या दिवाळीमुळे प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. नीरा- पुणे लोहमार्गाचे दुपद्रीकरणर आणि विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे, मुंबईकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस तसेच गोंदिया, नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस नीरा रेल्वे स्थानकांत तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना एक नंबरचा प्लॅटफॉर्मवर उतरून रेल्वेरूळ ओलांडून तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर उभ्या असलेल्या प्रवासी रेल्वेत बसण्याकरीता मोठी धावपळ करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने नीरा रेल्वेस्थानकात पुणेच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्यांचा प्लॅटफॉर्म बदलल्याने लहान मुल, वृद्ध, आजारी प्रवाशांची मोठी धावपळ होत असून, त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरत आहे.
रेल्वे स्थानकावर गैरसोय
पुरंदर तालुक्यातील नीरा स्थानकावर मागील काही दिवस झाले प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र आहे. रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट व्यवस्था नाही, सुट्टी खडी वरुन लोकांचे पाय घसरतात, पुरेशे शेड नाही, पाण्याची व टॉयलेटची सोय नाही, अशा तक्रारी प्रवाशांकडून वारंवार येत आहेत. तरीही प्रसासनाकडून या गैरसोयीवर तोडगा काढण्यात येत नाही आहे.
वयस्कर प्रवाशांसमोर रेल्वेत चढण्याचं मोठं संकट -
रेल्वे स्थानाकावरील प्लॅटफॉर्मची आणि रेल्वेची उंची वेगळी असते. खडी आणि उंचीमुळे अनेक प्रवासी रेल्वेमध्ये चढण्यासाठी घाबरतात. शिवाय रेल्वेदेखील काहीच वेळ स्थानकावर थांबते त्यामुळे प्रवाशांची चढण्यासाठी घाई करावी लागते. यात तरुण प्रवासी लगेच चढतात मात्र वयस्कर प्रवाशांना चढायला वेळ लागतो शिवाय उंच असल्यामुळे वयस्कर प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण परिसरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेशिवाय अनेकदा प्रवास करण्यासाठी त्यांच्याकडे पर्यांय उपलब्ध नसतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.