(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Accident News: सहलीला गेलेली शाळेची बस आंबेगावजवळ दरीत पलटली, सात विद्यार्थी गंभीर जखमी
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात शाळेच्या बसचा मोठा अपघात झाला आहे. बसमध्ये 44 विद्यार्थी आणि तीन शिक्षक होते. त्यातील सात विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
Pune Accident News: पुण्याच्या (Pune)आंबेगाव तालुक्यात शाळेच्या बसचा मोठा अपघात (Pune accident) झाला आहे. बसमध्ये 44 विद्यार्थी आणि तीन शिक्षक होते. त्यातील सात विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पिंपळगाव घोडा येथील मुक्ताई प्रशालेचे हे विद्यार्थी होते. त्यांच्या शाळेची शैक्षणिक सहल गिरवली येथील आयुका येथे गेली होती. त्यावेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.
शैक्षणिक सहलीवरुन परत येत असताना हा अपघात झाला आहे. एका तीव्र वळणावर बसचा ताबा सुटला आणि बस दरीत पलटली. आज (27 सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात बरेच विद्यार्थी जखमी झाले असून सात विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले असून जखमी सात विद्यार्थ्यांना मंचरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आंबेगाव तालुक्यातील गिरवली या ठिकाणी अनेकदा शालेय सहली जात असतात. या ठिकाणी आयुकाची दुर्बिण आहे. ही दुर्बिण बघण्यासाठी पुण्यातून किंवा पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी सहली जात असतात. गिरवली हे गाव उंच डोंगरावर वसलेलं आहे. त्यामुळे गावात जाणारा रस्ता घातक आणि तीव्र वळणाचा आहे. त्यामुळे या परिसरात अपघाताची कायम भीती असते. या ठिकाणी कमी वेगात वाहनं चालवावे लागतात. अनेकदा ताबा सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघाताची भीती असते. त्याच मार्गावर हा मोठा अपघात झाला आहे.
आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे घोडा येथील मुक्ताई प्रशालेची सहल सहल गेली होती. 44 विद्यार्थी उत्साहाने या सहलीत सहभागी झाले होते. शाळेतील तीन शिक्षकदेखील त्यांच्यासोबत होते. विद्यार्थ्यांनी दुर्बिण बघितली आणि शाळेतील विद्यार्थी परतीच्या प्रवासाला निघाले होते. त्यावेळी चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बस थेट दरीत कोसळली. या बसमध्ये 44 विद्यार्थी, 3 शिक्षक, एक चालक आणि एक शिपाई अशी 49 लोकं या बसमध्ये होते. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बसमधून मुलांना बाहेर काढलं. उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. अपघात कसा झाला याची माहिती पोलीस घेत आहे.