(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ!
पुण्याच्या तळेगावमध्ये एका कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पळ काढला. त्यानंतर जवळपास दीड तासांच्या नाट्यानंतर कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन पुन्हा रुग्णालयात दाखल केलं.
पुणे : पुण्याच्या तळेगावमध्ये एका 45 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (8 जुलै) संध्याकाळी घडलेल्या दीड तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर तिला ताब्यात घेण्यात यश आलं. तिला पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केलं आहे.
मायमर वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील कोविड सेंटरमध्ये या महिलेवर उपचार सुरु आहेत. 3 जुलैला या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर तिच्यावर उपचार सुरु आहेत.
शंभर खाटांच्या या कोविड सेंटरमध्ये सध्या चाळीसच्या आसपास रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल सायंकाळी ही कोरोनाग्रस्त महिला नजर चुकवत तळमजल्यावर आली. पण गेटवर सुरक्षारक्षक असल्याचे पाहून तीन फुटी सुरक्षा भिंतीवरुन उडी घेत तिने पळ काढला. सुरक्षारक्षकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाला सांगेपर्यंत ती नजरेआड झाली. यानंतर तळेगाव पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. तोपर्यंत या महिलेने कोविड सेंटरपासून साधारण अडीच किलोमीटर अंतर कापले आणि नवे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत जाऊन बसल्याचे निदर्शनास आले. या महिलेने काही उपस्थितांवर दगडफेकही केली होती.
तितक्यात रुग्णालय प्रशासन रुग्णवाहिका घेऊन तिथं पोहोचलं. पीपीई किट घालून काही कर्मचारी रुग्णवाहिकेतून खाली उतरले. त्या महिलेची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. महिला कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. बघता-बघता तासभर उलटला होता. मग काही स्थानिकांनी तिला बोलण्यात गुंतवले, महिला एका हातात वीट आणि दुसऱ्या हातात सळई घेऊन उभी होती. तेव्हाच पीपीई किट घातलेले कर्मचारी इमारतीच्या मागून आले आणि त्यांनी महिलेला ताब्यात घेतले. तरी ती पळ काढण्यासाठी झटापट करत होती, कसंबसं तिला रुग्णवाहिकेत बसवण्यात आले. दीड तासानंतर कोरोनाग्रस्त महिला रुग्णालयात पोहोचली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.