Chitra Wagh: 'या लढाईत प्राजक्ता एकटी नाही', सुरेश धसांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ याचं परखड मत, म्हणाल्या 'स्त्रीचा सन्मान याला भाजपाचे...'
Chitra Wagh on Prajakta Mali: भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवरती प्राजक्ता माळीला टॅग करत एक पोस्ट शेअर केली आहे.
पुणे: भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरती टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीसह इतर अभिनेत्रींचा नाव घेतलं. त्यानंतर आता यावरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्याच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळीने महिला राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भामध्ये प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती तिने दिली आहे. प्राजक्ता माळीने काल यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर आता भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला आहे, अनेक कलाकारांनी देखील प्राजक्ता माळीला समर्थन देत सोशल मीडिया वरती पोस्ट लिहल्या आहेत, त्याचबरोबर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवरती प्राजक्ता माळीला टॅग करत एक पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हणाल्यात चित्रा वाघ?
चित्रा वाघ यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर)वरती पोस्ट लिहून प्राजक्ता माळीला समर्थन दिलं आहे. 'स्त्रीचा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे. त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही, आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे, या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते, असं त्यांनी म्हटलं आहे.
स्त्री चा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे …
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 29, 2024
त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही…
आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे…
या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास…
चंद्रकांत पाटील काय म्हणालेत?
आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली. राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये सामाजिक आणि संवेदनशीलपणा देखील आहे. या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे. पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे. तुम्ही असं करू नये, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले आहेत.
नेमकं काय म्हणाले होते धस?
मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर भाष्य करत त्यांनी कराड यांचे विविध कारनामे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतलं होतं. सपना चौधरी, रश्मिका, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा पसार करावा’, असं धस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाली गौतमी पाटील?
ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या, कोणत्या नेत्यासोबतच किंवा कोणाही सोबत त्याचं नाव जोडू नका. कारण कलाकाराचे दुःख हे कलाकारालाच माहिती असतं. आज कोणाला काय त्रास होतोय ते तुम्हाला माहित नाही. मलाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. पण, माझा त्रास मला माहिती. लोकांना तो माहीत नाही. ते चुकीचं आहे. प्लीज कोणासोबत कोणाचं नाव जोडू नका उलट कलाकाराला तुम्ही सपोर्ट करा, प्राजक्ता ताई आम्ही तुझ्या सोबत आहोत. प्राजक्ता ताईनेही खंबीरपणे उभं राहून आपली कला सादर करत राहावी, आणि हसत राहावं, असं गौतमीनं म्हटलं आहे.