पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात, असा असेल सीरम इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत.पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांच्यासोबत मिळून कोव्हीशील्ड या कोरोनाच्या लसीची निर्मिती करते आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला संध्याकाळी साडे चार ते साडे पाच या वेळेत भेट देणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला हे पंतप्रधानांना सीरम इन्स्टिट्यूट बद्दलची प्राथमिक माहिती देतील. त्यानंतर पंतप्रधान कॉन्फरन्स रूममध्ये जातील. तिथे सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार केल्या जात असलेल्या लस निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, याबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या ठिकाणी लस बनवली जाते आहे त्या प्लांटला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सीरम इन्स्टिट्यूट भेटीचा कार्यक्रम एक तासाचा असणाार आहे.
पंतप्रधानांच्या या पुणे दौऱ्यासाठी 100 देशांच्या राजदुतांचा सीरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा कार्यक्रम पुढं ढकलण्यात आला आणि काल राजदूतांचा हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांच्यासोबत मिळून कोव्हीशील्ड या कोरोनाच्या लसीची निर्मिती करते आहे. खरंतर सिरम इन्स्टिट्यूटकडून मे महिन्यापासूनच कोरोना लसीचे डोस बनवणं सुरु आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्याा यशस्वी झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोना व्यक्तींचे डोस बनवण्यास सुरुवात करण्यात आली आणि आत्तापर्यंत कोरोना लसीचे आठ कोटी डोस सीरम इन्स्टिट्यूटमधे तयार करण्यात आलेत. सीरम इन्स्टिट्यूट ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. जगभरातील वेगवेगळ्या आजारांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लसींपैकी 65 टक्के व्हॅक्सीन या एकट्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केल्या जातात त्यामुळे व्हॅक्सिन निर्मितीमध्ये सीरम इन्स्टिट्यूटची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सीरम इन्स्टिट्यूट बरोबरच अहमदाबाद आणि हैदराबाद मधील इतर दोन कंपन्यांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीची प्रगतीची माहिती घेत आहेत. सर्वसामान्यांपर्यंत ही लस कधी पर्यंत पोहोचेल याबाबत लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.