पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींची रुग्णालयात भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुण शौरीसोबत जवळपास 15 मिनिट चर्चा केली. या भेटीदरम्यान अरुण शौरी यांचे नातेवाईकही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची पुण्यात भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिट चर्चा झाली. पुण्यातील बंड गार्डन परिसरातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये अरुण शौरी काही दिवसांपासून अॅडमिट आहेत. नरेंद्र मोदी आणि अरुण शौरी यांची रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान भेट झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "पुण्यात आज माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काही वेळ बातचित केली. त्यांच्या दिर्घायुष्य आणि निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करतो."
In Pune, I met former Union Minister Arun Shourie Ji. Enquired about his health and had a wonderful interaction with him.
We pray for his long and healthy life. pic.twitter.com/arjXSUoirf — Narendra Modi (@narendramodi) December 8, 2019
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुण शौरीसोबत जवळपास 15 मिनिट चर्चा केली. या भेटीदरम्यान अरुण शौरी यांचे नातेवाईकही त्यांच्यासोबत उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि अरुण शौरी यांची भेट नियोजित नव्हती, अशी माहितीही समोर येत आहे.
विमानतळावर पोहोचण्याआधी जवळपास 45 मिनिट मोदींनी हॉस्पिटलमध्ये घालवले. देशभरातील पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसांच्या परिषदेचं आयोजन यावर्षी पुण्यात करण्यात आलं होतं, यामध्ये नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
अरुण शौरी आपल्या लवासा येथील बंगल्याच्या परिसरात वॉकला गेले असताना पाय घसरुन ते पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. न्युरो सर्जन डॉ. सचिन गांधी यांच्या देखरेखीखाली अरुण शौरी यांच्यावर रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. अरुण शौरी यांच्या डोक्याला किरकोळ इजा झाली आहे. अरुण शौरी 1999 ते 2004 दरम्यान अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते.