पंतप्रधान मोदींकडून इंदापूरच्या नवविवाहित दाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदापूरमधील नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. मुलाच्या वडिलांनी पंतप्रधानांना पत्र लिहून लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर मोदींनी पत्र पाठवून या नवदाम्पत्याला सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या.
इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथील नवदाम्पत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी दीपक आणि वैभवी यांना भावी वाटचालीस मोदींनी अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. 21 नोव्हेंबरला दीपक आणि वैभवीचे लग्न झालं. दीपक यांच्या वडील नानासाहेब लक्ष्मण धनावडे यांनी पंतप्रधान मोदींना लग्नाचे आमंत्रण दिलं होतं. त्यावर काल (24 डिसेंबर) मोदींनी लिहिलेलं शुभेच्छांचे पत्र धनावडे यांना मिळाले. थेट पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्यामुळे धनावडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
दीपक धनावडे हे पेशाने तलाठी आहेत. ते पुणे जिल्ह्यातील मावळ भागात नोकरी करतात. तर दीपक यांची पत्नी वैभवी या MBA झालेल्या आहेत. वैभवी गुंड या मूळच्या माळशिरस तालुक्यातील महालुंग गावच्या आहे. दीपक आणि वैभवीचा विवाह मोठ्या थाटात इंदापूरच्या निकिता लॉन्समध्ये 21 नोव्हेंबरला झाला.
लग्नासाठी आपण प्रतिष्ठित लोकांना बोलवत असतो. देशातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदींना आमंत्रण द्यावं असं नानासाहेब धनावडे यांनी ठरवलं. त्यांनी मोदींना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्याच्या निर्धार केला. दीपकचे मामा आणि वडील यांनी 16 नोव्हेंबर रोजी मोदींना लग्नाची पत्रिका पोस्टद्वारे पाठवली आणि त्याच उत्तर म्हणून काल मोदींचे शुभेच्छा देणारं पत्र आलं.
मोदींनी पत्रात काय लिहिलं? चि. दीपक आणि चि. सौ. का वैभवी यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका मिळाल्याने आनंद झाला. मला तुमच्या कौटुंबिक आनंदात सहभागी करुन घेतल्याबद्दल खूप खूप आभार. वर आणि वधूला नव्याआयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान लाभो. विश्वास आणि मैत्रीचा धाग्याने तुम्ही सदैव बांधलेले राहावं. तुमच्या नात्यात प्रेम असावं. उत्तम ताळमेळ साधून आयुष्यात पुढे जा आणि काळासह तुमचं नातं आणखी दृढ आणि मजबूत व्हावं अशी प्रार्थना करुन तुम्हाला सुखी संसारासाठी आशीर्वाद देतो.
पंतप्रधान मोदींनी पाठवलेल्या पत्रावर नानासाहेब धनावडे आणि कुटुंबियांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.