Pimpri Chinchwad News : तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक शरीरावर, दुचाकीस्वाराचा मृत्यू; हिंजवडीतील विचलित करणारी दृश्य मोबाईलमध्ये कैद
Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. अपघातानंतर ट्रकचे मागील चाक दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटं होतं. कंबरेखालील शरीराचा भाग चाकाखाली चिरडला गेला.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत (Hinjawadi) ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. अपघातानंतर ट्रकचे (Truck) मागील चाक दुचाकीस्वाराच्या (Bike) शरीरावर तब्बल दहा मिनिटं होतं. कंबरेखालील शरीराचा भाग चाकाखाली चिरडला गेला. हे पाहून ट्रक चालक फरार झाला तर दुचाकीस्वाराचा यात मृत्यू झाला. अपघाताची विचलित करणारी दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. रामदास वडजे असं मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचं नाव होतं. याप्रकरणी ट्रक चालक रंगनाथ तांबेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र दुचाकीस्वार ट्रकखाली चिरडलेला असतानाही सुरुवातीला कोणीही त्याची मदत केली नाही ही शोकांतिका आहे.
ट्रकच्या मागील बाजूच्या दोन्ही चाके रामदास वडजे यांच्या शरीरावर
हिंजवडीच्या लक्ष्मी चौकलगत बुधवारी (23 ऑगस्ट) सकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मी चौकालगत राहणारा रामदास वडजे दुचाकीवरुन कामाला निघाले होते. पण पुढे काही अंतरावर आपल्यासोबत काही घडेल, अशी त्यांनी कल्पना देखील केलेली नसेल. कारण मागून लोडेड ट्रक भरधाव वेगात आला आणि लक्ष्मी चौकापुढील विठ्ठल लॉन्ससमोर रामदास यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक बसली. मात्र ट्रक इतक्या वेगात होता की चालक त्यावर नियंत्रण मिळवू शकला नाही. शेवटी ट्रकच्या मागील दोन्ही चाके रामदास यांच्या शरीरावर होती, कंबरेखालील भाग तर अक्षरशः चिरडला.
बस चालक आणि प्रवाशांनी धक्का देत ट्रक बाजूला केला पण...
तशा अवस्थेत रामदास वडजे मदतीची याचना करत होते. परंतु ट्रक चालकाने मात्र रामदासला तशाच अवस्थेत सोडून तिथून पळ काढला तर काही महाभागांनी त्याला मदत करण्याऐवजी मोबाईल फोन हातात घेतला अन् रामदासच्या वेदना त्यात कैद केल्या. पण अशा वेळी एका बस चालकाने संवेदनशीलता दाखवली, बस बाजूला घेतली आणि चालकाच्या सोबतीला बसमधील इतरांनी ही प्रसंगावधान दाखवलं. या सर्वांनी ट्रकला धक्का दिला अन् तब्बल दहा मिनिटांनी रामदास वडजे यांची ट्रकच्या चाकाखालून सुटका झाली. तितक्यात पोलीस तिथे पोहोचले, त्यांनी रामदास यांना तातडीने रुग्णालयात हलवलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या रामदास वडजे यांनी जीव सोडला होता. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी फरार ट्रक चालक रंगनाथ तांबे याला बेड्या ठोकल्या.
हेही वाचा