(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : चैतन्य महाराजांना बेड्या, सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणारे महाराज पिंपरी पोलिसांच्या कचाट्यात!
Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar: उपदेशाचे डोस पाजणारे रिल्स बनविणारे चैतन्य महाराज वाडेकर सर्वश्रुत आहेत. मात्र सोशल मीडियावर संत बनू पाहणाऱ्या या चैतन्य महाराजांचा एक प्रताप समोर आला आहे.
पुणे: प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य वाडेकर (महाराज) (Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar) यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. उपदेशाचे डोस पाजणारे रिल्स बनविणारे चैतन्य महाराज वाडेकर सर्वश्रुत आहेत. मात्र सोशल मीडियावर संत बनू पाहणाऱ्या या चैतन्य महाराजांचा एक प्रताप समोर आला आहे. या प्रतापापायी त्यांना तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
चैतन्य वाडेकरांनी (Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar) तीन भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने खाजगी रस्त्यासह कंपाऊंड उखडला आहे. चाकण एमआयडीसी हद्दीत चैतन्य वाडेकर वास्तव्यास आहेत. तिथल्याचं एका बिल्डरसोबत वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरु आहेत. या बिल्डरने त्यांच्या घरा लगतची जागा विकसित केली असून, तिथं कंपनी उभारण्यात आली आहे. मात्र या बिल्डरने माझी जागा हडपली असून माझ्या जागेतून खाजगी रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबीयांनी केला आहे. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी, अशी मागणी वाडेकरांकडून नेहमी करण्यात येत होती. मात्र, ही मागणी मान्यचं होत नव्हती. यावरून न्यायालयीन लढा सुरु असतानाच वाडेकरांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली.
मात्र, यातून ही जागा वाडेकरांच्या (Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar) मालकीची आहे. हे सिद्ध होण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं, अपेक्षित होतं. न्यायालयाने मोजणीची मागणी पूर्ण करताचं चैतन्य वाडेकर हरकून गेले. त्यांनी त्यांच्या तीन भावांसह इतर साथीदारांना एकत्र केलं, जेसीबी ही मागवला आणि रात्रीतचं कंपनीकडे जाणारा खाजगी रस्ता उखडून टाकला, कंपाऊंड ही तोडून टाकला. मग प्रकरण महाळूंगे पोलीस स्टेशनमध्ये गेलं.
आजवर समाजाला उपदेशाचे सल्ले देणाऱ्या महाराजांचे रिल्स पाहिलेल्या पोलिसांना ही हा पराक्रम पाहून धक्का बसला. आता चैतन्य महाराजांना महाराज म्हणावं तरी कसं? साहजिकच असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. बरं, आता आपण कायदा हातात घेतला तर चूक मान्य करावी? पण सोशल मीडियावर महाराज बनून संत बनू पाहणारे चैतन्य वाडेकर शांत बसले तर नवलंचं म्हणावं लागेल? अपेक्षेप्रमाणे त्यांनी पोलिसांना आपण किती फेमस आहोत आणि किती शहाणे आहोत, याचे उपदेशाचे डोस द्यायला सुरुवात केली.
सुरुवातीला पोलिसांनी सबुरीने घेतलं, मात्र पोलिसांची सहनशीलता अखेर संपली. मग स्वतःला महाराज समजणाऱ्या चैतन्य वाडेकरांना पोलिसांनी कायद्याचे डोस पाजले. तेव्हा हवेत असणारे चैतन्य वाडेकर जमिनीवर आले. मग हळूहळू करत आपल्या चुका मान्य करू लागले. सोशल मीडियावर हवा करणाऱ्या चैतन्य वाडेकरांना अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. पोलिसांनी त्यांच्यासह तीन भाऊ आणि इतर दोन अशा सहा जणांना बेड्या ठोकल्या. जेसीबी ही जप्त केले आहे.
चैतन्य वाडेकरांप्रमाणे (Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar) अनेक व्यक्ती सोशल मीडियावर आपण किती महान आहोत, हे भासवण्याचा ते प्रयत्न करतात. सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी ही या भूलथापांना बळी पडतात. ही पिढी या अशांना अक्षरशः डोक्यावर घेते, मात्र सोशल मीडियावर स्वतःला महान दर्शविणाऱ्या या व्यक्तीचा प्रत्यक्षात एक वेगळा चेहरा असतो. चैतन्य महाराजांच्या या प्रतापाने ते पुन्हा एकदा अधोरेखित झालं. त्यामुळं 'दिसतं तसं नसतं, म्हणूनचं जग फसतं' ही म्हण सुद्धा यानिमित्ताने सत्येत अवतरली आहे.