PCMC Crime News : मित्राकडून खंडणी लुबाडण्यासाठी रचला बनाव, कटात पोलिसांचा ही सहभाग; मित्र अटकेत मात्र पोलीस फरार
पिंपरी- चिंचवडमध्ये श्रीमंत मित्राला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची आणि तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. मात्र पैसे उकळणासाठी रचलेला हा बनाव पोलीस तपासात उघड झाला.
पिंपरी- चिंचवड, पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये श्रीमंत मित्राला (Crime News) गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची आणि तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. मात्र पैसे उकळणासाठी रचलेला हा बनाव पोलीस तपासात उघड झाला. धक्कादायक म्हणजे या कटात दोन पोलिसांचा ही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्या दोन पोलिसांसह (PCMC Police) आठ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने देहूरोड पोलीस(Dehu Police Station) ठाण्यात तक्रार दिली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ऑनलाइनद्वारे 4 लाख 97 हजार घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिरझा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी, देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ अशी आरोपींची नाव आहेत. पैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खिशात गांजाची पुडी सापडली अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुण हा पिंपरी- चिंचवडमधील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा विश्वास संपादन केला. त्याची सर्व माहिती घेतली. तो श्रीमंत असल्याचं कळताच त्याच्याकडून पैसे उकळायचं ठरवलं. मित्रांनी आधीच ओळखीच्या पोलिसांना माहिती देऊन, खंडणी उकळण्याचा कट रचला. यासाठी 19 वर्षीय तक्रारदार तरुणाला कॅफेत बोलावलं. कॉफी पिता पिता त्याला बोलण्यात गुंतवलं आणि त्याला काहीही कळू न देता, त्याच्या खिशात गांजाची पुडी टाकली. तिथं आधीच बोलावून ठेवलेल्या दोन पोलिसांना काम फत्ते झाल्याचं कळवलं. मग पोलिसांनी त्याची तपासणी केली अन त्याच्याकडे गांजाची पुडी आढळली. खिशात गांजाची पुडी सापडली हे पाहून त्याला मोठा धक्का बसला. पण काही कळायच्या आत त्या तरुणाला पोलिसांनी देहूरोड पोलीस ठाण्यात आणलं. या गुन्ह्यातून सुटका करून घ्यायची असेल तर वीस लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी मित्रांसह पोलिसांनी केली. आता गुन्हा दाखल होणार म्हणून बिथरलेल्या तरुणाने जागेवरच 4 लाख 98 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर केले. मग त्याला सोडून देण्यात आलं. पण हा गौडबंगाल देहूरोडमधील इतर पोलिसांच्या कानावर पडला. मग मात्र तपासाची चक्र उलट फिरली आणि मित्रांसह दोन्ही पोलिसांचे बिंग फुटले. आठ पैकी चार जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
इतर महत्वाची बातमी-