(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MPSC Student Protest : लेखी आदेश निघेपर्यंत मागे हटणार नाही, MPSC चे विद्यार्थी आंदोलनावर ठाम
MPSC Student Protest : जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका MPSC च्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
MPSC Student Protest : पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, काल रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलन स्थळावरुनच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत फोनवरुन संवाद देखील साधला होता. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यी आंदोलनावर ठाम आहेत.
आत्तापर्यंत आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं
आम्ही आंदोलन मागे घेलं नाही. अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी माडंली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं. पण अधिकृत नोटीस निघाली नसल्याची मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुणे शहरात दोन-दोन तीन-तीन दिवस राहतात. मात्र, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायला येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
आज आंदोलनाचा तिसरा दिवस
गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थ्याचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आंदोनस्थळी आले होते. त्यांनी फोनवरुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. सध्या विद्यार्थी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत लेखी आंदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याचे शरद पवार म्हणाले. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाने आपल्यासोबत यावं असंही शरद पवारांनी सांगितलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळं तुमची बाजू मांडणं आवश्यक आहे असंही शरद पवार म्हणाले.
पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ पवारांसोबत जाणार
शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांचं शिष्टमंडळ हे शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. या शिष्टमंडळात कोण असणार याची नावंही विद्यार्थ्यांनी जाहीर केली. यावेळी शरद पवारांना विद्यार्थ्यांनी जागा करून दिली आणि शरद पवार विद्यार्थी आंदोलनच्या मधोमध पोहोचले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना खुर्ची देऊ केली पण पवारांनी ती नाकारली आणि उभं राहून संवाद साधला.
20 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु
सोमवारपासून (20 फेब्रुवारी) पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरं आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना (Corona) असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पॅटर्न (New MPSC Pattern 2025) लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.