(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe :... यामुळे शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर खासदार अमोल कोल्हे बहिष्कार टाकणार!
पुण्यातील शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शासकीय शिवजयंती (shivjayanti) सोहळ्यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी बहिष्कार करत असल्याचं जाहीर केलं आहे.
Amol Kolhe : पुण्यातील शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शासकीय शिवजयंती (Shiv Jayanti) सोहळ्यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी बहिष्कार करत असल्याचं जाहीर केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असताना अद्याप शिवनेरीवर भगवा ध्वज कायमस्वरुपी फडकवला नाही. त्यामुळे कोल्हे यांनी ही भूमिका घेतलेली आहे. कोल्हे स्वतः जुन्नरचे रहिवाशी असून त्यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात हा शिवनेरी किल्ला येतो. खासदार कोल्हे यांनी गडावर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावावा यासाठी लोकसभेत ही मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीला कोणी दाद दिली नाही. त्यामुळे आता त्यांनी शिवनेरीवर शासकीय शिवजयंतीवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
ते म्हणाले की, "शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमाची पत्रिका मला मिळाली आहे. त्यासाठी सरकारचे आभार मानतो. मी शिवजयंती साजरी करणारच आहे. शिवभक्तांसाठी हा मोठा सण आहे. मात्र त्यात बरोबर शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेकांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर खासदार म्हणून मी बहिष्कार करत आहे."
...म्हणून अमोल कोल्हेंचा शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार
बरीच वर्ष झाली मात्र अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर अजूनही कायमस्वरुपी भगवा ध्वज नाही. 2021 पासून अनेक मंत्र्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून मी किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी करत आहे. संसदेत देखील हा मुद्दा किंवा ही मागणी मी केली आहे. एवढंच नाही तर संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीतही मागणी केली होती. भगवा ही आमची अस्मिता आहे आणि शिवभक्तांचा फार मोठा गर्व आहे. या सगळ्यांचा आदर करुन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घ्यावी मात्र या दृष्टीने ठोस पावलं उचचली जात नाहीत. भगवा ध्वज नसल्याची जाणीव करुन देण्यासाठी मी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असं ते म्हणाले.
शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर कोणकोणते कार्यक्रम?
18 फेब्रुवारी 2023
सायं. 6.30 वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023 उदघाटन .
सायं. 7 ते रात्री 10 वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम.
19 फेब्रुवारी 2023
स. 9 ते 11 वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
दु. 3 ते 5 वा. शिववंदना
सायं. 6.15 ते 7 वा. महाआरती कार्यक्रम
सायं. 7 ते रात्री 10 वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम
20 फेब्रुवारी 2023
सायं.7 ते रात्री 10 वा. जाणता राजा कार्यक्रम