पुणेकर गॅसवर, पीएमपीएमएल बसेसना सीएनजीचा पुरवठा बंद करण्याचा एमएनजीएलचा निर्णय
पुणे महानगर पालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन 47 कोटी पैकी 24 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दिले जातील, असं सांगितलं.
पुणे : पुण्यातील पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन लिमिटेड) विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असते. आता पीएमपीएमएलमधील 1 हजार 235 सीएनजी बसेसचा गॅस पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड उद्यापासून बंद करणार आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. एमएनजीएलने (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडेही पाठपुरावा केला. पण त्यांनीही त्यावेळी दुर्लक्ष केलं.
पीएमपीएमएल जवळपास 1500 बसेसच्या माध्यमातून पुणेकरांना सेवा देत आहे. यापैकी 1 हजार 235 बसेस या सीएनजीवर धावतात. मागील दोन वर्षापासून असलेली थकबाकी 47.22 कोटींवर पोहोचली आहे. याबाबत एमएनजीएलकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएमएलकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनाही याविषय माहिती असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उद्यापासून बसेसचा गॅस पुरवठा बंद करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या पवित्र्यानंतर अखेर पुणे महानगर पालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन 47 कोटी पैकी 24 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दिले जातील, असं सांगितलं. मात्र एमएनजीएलचे अधिकारी मात्र जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही, तोपर्यंत सीएनजी पुरवठा बंद करण्यावर ठाम आहेत.
आधीच पीएमपीएमएलची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे महापालिकेने उर्वरित थकबाकी लवकर भरल्यास पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पायाला चटके बसू नये याची खबरदारी सत्ताधाऱ्यांनी घेणं गरजेच आहे.