मोठी बातमी: समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
पुण्याजवळील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
पुणे : समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) पुण्याला जोडला जाणार आहे. पुणे आणि शिरूर (Pune To Shirur) दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. पुण्याजवळील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे - शिरूर - अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे .
महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर
पुण्याजवळील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार असून ५३ किलोमीटरचा हा उड्डाणमार्ग शिरूरपर्यंत पोहचणार आहे . त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे . मात्र आता हा प्रस्तावित उड्डाणमार्ग पुढे अहमदनगर आणि तिथून पुढे छत्रपती संभाजी नागरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय . त्यासाठी आणखी 2050कोटी रुपये खर्च येणार असून एकूण खर्च 9565रुपये इतका येणार आहे . या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर इतकी असणार आहे .
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सुधारित मार्गाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग पूर्वी ‘एनएचएआय’मार्फत करण्यात येणार होता. त्याला मान्यताही देण्यात आली होती. मात्र, एप्रिल दरम्यान हा महामार्ग ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआयडीसी’ यांच्यात झालेल्या करारानुसार ‘एमएसआयडीसी’कडे हस्तांतर करण्यात आला. त्यामुळे त्या प्रकल्पावर ‘एमएसआयडीसी’ मार्फत काम करण्यात येत आहे.