Pune News : पुण्यात 1 एप्रिलपासून हेल्मेटसक्ती, 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं
पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.
पुणे : पुण्यात दुचाकीवरून प्रवास करताना 1 एप्रिलपासून हेल्मेटसक्ती प्रशासनाचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यात 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं असून हेल्मेटसक्तीचं उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कार चालकांच्या तुलनेत दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट अधिक असतो. रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांपैकी 62 टक्के व्यक्तींचा डोक्यावर इजा झाल्याने मृत्यू झाला आहे. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्के आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये दुचाकीस्वारांना सक्ती
पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या, दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्तीचे आदेश देण्यात आले. शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर शासकीय आवारात दुचाकी वापरतांना हेल्मेट न घालता प्रवेश केल्यास अधिकारी, कर्मचारी, नागरीक हे मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 129 चे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :