Pune Bypoll Election: ठरलं... राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार
Maharashtra Bypoll Election: अजित पवार काही वेळात चिंचवडमध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीत नाना काटे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Maharashtra Pune Bypoll Election: बराच काळ सस्पेन्स कायम ठेवल्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. नाना काटे (Nana kate) यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करुन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नाना काटे यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. अजित पवार काही वेळात चिंचवडमध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीत नाना काटे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
पुण्यातील (Pune) कसबा (Kasba Bypoll) आणि चिंचवडची (Chinchwad Bypoll) पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे, यात काहीच शंका नाही. पुणे पोटनिवडणुकीत (Bypoll Election) भाजप (BJP) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी थेट लढत दिसणार आहे. अशातच भाजपनं दोन्ही जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून बराच काळ सस्पेन्स ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडीकडून कसब्याची जागा काँग्रेसला आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. काँग्रेसनं कसब्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निवडणूक कोण लढवणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक कोण लढवणार? याचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवायचं राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवलं होतं. काल (सोमवारी) अजित पवारांनी पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची पिंपरी-चिंचवडमधे येऊन बैठक घेतली. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करतील आणि अजित पवार या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी पोहचतील असं राष्ट्रवादीकडून ठरवण्यात आलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमका एवढा सस्पेन्स का ठेवला? त्यामागे नेमकी कारणं काय? याबाबत जाणून घेऊयात...
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जयंत पाटील जाहीर करतील, अशी माहिती पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. दुसरीकडे अजित पवारांनी रात्री पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची भेट घेतली होती. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे नाना काटे आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले राहुल कलाटे यांनाही बैठकीत बोलावलं असल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. मध्यरात्री बराचवेळ चर्चा झाली, मात्र पवारांनी या दोघांपैकी कोणालाच उमेदवारीबाबत स्पष्ट काहीच सांगितलं नव्हतं. आज अखेर जयंत पाटलांनी ट्वीट करुन नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवायचं राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवलं होतं. राष्ट्रवादीकडून उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवण्याची कारणं नेमकी काय?
राष्ट्रवादीला बंडखोरीची भीती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती. राहुल कलाटे हे आधी शिवसेनेचे नगरसेवक होते. 2019 लढवणार त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांना राष्ट्रवादीकडून पाठिंबा देण्यात आला होता. राहुल कलाटे राष्ट्रवादीकडून इच्छुक असले आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही त्यांना स्वीकारण्यास तयार असले, तरी चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक होते. राहुल कलाटेंना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीत बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीकडून उमेदवाराबाबत सस्पेन्स ठेवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीनं निवडणूक बिनविरोध केल्यास उमेदवारी टिळक कुटुंबाला देऊ, आज दुपारी 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम भाजपनं दिला आहे. तसेच, आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. कसबा पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune Bypoll election : भाजपचं कोडं सुटलं, मविआचं तिढा कायम, चिंचवड मविआची उमेदवारी कुणाला मिळणार?