महाविकासआघाडीतील आजी-माजी आमदारांमध्ये भर कार्यक्रमात हमरीतुमरी
NCP and Shivsena : जुन्नरमध्ये भर कार्यक्रमात आजी-माजी आमदारांमध्ये हमरीतुमरी झाली.
पुण्यात महाविकासआघाडीतील बिघाडीचा आणखी एक अंक समोर आला आहे. यावेळी तर थेट आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर उतरले. पुण्याच्या जुन्नर विधानसभेत हा प्रकार घडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर अरेरावी केली. हे पाहून उपस्थित अवाकच झाले. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री रस्ता योजनेतील कामाचं श्रेय घेण्यावरून हा वाद रंगला.
उंब्रज नंबर दोन गावातील रस्त्याचे काल सायंकाळी उद्घाटन होते. पण राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बेनके यांनी या कार्यक्रमाला शिवसेनेला डावलले. मुख्यमंत्र्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेला शिवसेनेला आमंत्रण न देता राष्ट्रवादी श्रेय घेत होती. हे पाहून माजी आमदार सोनवणेंनी त्या कार्यक्रमात बेनके यांच्या आधी उपस्थिती लावली. मग काही वेळेनंतर बेनके आले आणि दोघे आजूबाजूलाच जवळच बसले. तेव्हा सोनवणे यांनी श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करत, जाब विचारला आणि हे विचारताना बेनके यांच्या हाताला स्पर्श केला. यावरून बेनके अचानक संतापले, मला हात लावायचा नाही. असं बेनके ठणकावू लागले. त्याला प्रतिउत्तर देताना मी फक्त स्पर्श केलाय, तुम्ही पटत नाही. तर मग माझ्या बाजूला कशाला बसले. असं सोनवणे म्हणाले. यावर बोलताना बेनके यांनी तुम्ही फक्त चर्चा करा, असं म्हटलं. तेंव्हा सोनवणे संतापले चर्चा करा म्हणता अन हाताचा मुद्दा घेऊन काय बसलात. असं म्हणत हे आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात सर्वांदेखत हमरीतुमरीवर आले. त्यामुळे उपस्थित सगळेच अवाक झाले.
लोकप्रतिनिधीच एकमेकांवर अरेरावी करू लागल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नंतर ग्रामस्थांनीच मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटवला. हा वाद संपुष्टात येत असताना दोघेही एकमेकांच्या कानात कुजबुज करू लागले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या अन उलटसुलट चर्चा पुन्हा रंगल्या.
महाविकासआघाडीतील असा वाद पहिलाच नाही
पुण्यातील लांडेवाडीत 1 जानेवारीला होणारी बैलगाडा शर्यत ऐनवेळी स्थगित करण्यात आली. यावरून माजी खासदार आढळराव पाटलांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. जिल्ह्यातील शिवसेना संपविण्याचं काम सुरू असून आमच्यावर वारंवार वार केले जात आहेत. गेली दोन वर्षे आम्ही ते सहन करतोय. तरीही आम्ही तग धरून आहोत. फक्त आम्हाला शिवसैनिक म्हणून जगू द्या, असं म्हणत आढळरावांनी खंत व्यक्त केली होती.
जुन्नरच्या आजी-माजी आमदारांच्या वादातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कार्यक्रमाचा मंच सोडून जावं लागलं होतं.
खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांमध्ये विकास कामावरून खडाजंगी झाली होती. आढळरावांनी महामार्गावरील दोन टप्प्यांचे उद्घाटन एक दिवस आधीच उरकले होते. त्यावरून कोल्हे यांनी उद्धव ठाकरे हे शरद पवारांमुळं मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं.
खेड-आळंदीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्यात ही मोठा वाद रंगला होता. पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया या वादाला निमित्त ठरली. तेंव्हा तर खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि पालकमंत्री अजित पवारांना डिवचले होते.