(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना पास करणारा मंत्री म्हणून माझी घराघरात ओळख बनली!: उदय सामंत
परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करणारा मंत्री म्हणून माझी राज्यातील घराघरात ओळख निर्माण झाली आहे असं उदय सामंतांनी (Uday Samant) म्हटलं आहे.
पिंपरी चिंचवड : परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करणारा मंत्री म्हणून माझी राज्यातील घराघरात ओळख निर्माण झाली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणून माझ्याकडे एक ही व्यक्ती पाहत नाही, असं उदय सामंतांनी (Uday Samant) म्हटलं आहे. हे म्हणताना त्यांचा सूर हा मिश्किल होता. पण विद्यार्थ्यांना या मानसिकतेतून बाहेर काढायला हवं आणि यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यायला हवा, असं आवाहन सामंतांनी केलं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये खासदार श्रीरंग बारणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामंतांनी ही बाब अधोरेखित केली. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे मंत्री सामंत घराघरात पोहोचले. असे गौरवोद्गार शिवसेना नेते सचिन अहिरांनी काढले.
हाच धागा धरून सामंत म्हणाले पण मला घराघरात नेमकं कशामुळे ओळखू लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात मी विविध कार्यक्रमांसाठी जातो. तेंव्हा मंचावरील खुर्चीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री बसला म्हणून मला एक ही जण ओळखत नाही. तर परीक्षा रद्द करून, विध्यार्थ्यांना पास करणारा हा मंत्री आला अशी माझी प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळेच मी विद्यार्थ्यांच्या आवडीचा मंत्री झालोय,असं म्हणताना सामंतांचा मिश्किल सूर होता, त्यामुळे सभागृहात देखील हशा पिकला.
पण ही भावना चुकीची आहे, त्यामुळे विध्यार्थ्यांना त्या मानसिकतेतून बाहेर काढायला हवं. यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी पुढाकार घ्यायला हवा. असं आवाहन सामंतांनी केलं.
पूर्ण क्षमतेने महाविद्यालये खुली करण्याचे संकेत
सामंत म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट प्रत्येक राज्यात आता ओसरू लागलेली आहे. सध्या ऑफलाईन वर्ग भरतायेत तसंच आता ऑफलाईन परीक्षा घेण्याचा ही मानस आहे. यापुढे जाऊन जर पूर्ण क्षमतेने अथवा पन्नास टक्केहून अधिक क्षमतेने वर्ग सुरू करायचे असतील तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांनी तशी सविस्तर चर्चा करायला हवी. ज्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आलाय तिथून तसा प्रस्ताव कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आमच्याकडे पाठवावा. त्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग नेमलेल्या तज्ञांशी चर्चा करेल आणि प्रस्ताव आलेल्या भागातील परिस्थिती अनुकूल आहे, असं निदर्शनास आल्यास त्या महाविद्यालयांना तशी मान्यता दिली जाईल.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय स्थापन करण्याला आजच्या मंत्रिमंडळाची पूर्णतः मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर राज्याच्या विविध विद्यापीठातील अठरा अद्यासन केंद्रांना प्रत्येकी तीन कोटींचा निधी देण्याचा निर्णय ही आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत झाल्याच सामंत यांनी सांगितलं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha