Pune Ganpati News: पुण्यात यंदा शेवटचे 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी; मुख्यमंत्र्यांची घोषणा
दरवर्षी शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर लावायची परवानगी असते मात्र यावर्षी त्यात एक दिवस वाढवण्यात आला आहे. यावर्षी पाच दिवस लाऊडस्पीकरला परवानगी असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केली आहे.
Pune Ganpati News: दरवर्षी शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर लावायची परवानगी असते मात्र यावर्षी त्यात एक दिवस वाढवण्यात आला आहे. यावर्षी पाच दिवस लाऊडस्पीकरला परवानगी असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केली आहे. पोलीस आयुक्त आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री काल पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं शहर आहे. ऐतिहासिक वारसा देखील पुण्याला लाभला आहे. सार्वजनिक गणपतीउत्सव देखील मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. देशभरातून लोक पुण्यात गणोशोत्सवाला येतात. दोन वर्ष सगळ्या सणउत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे ते सणउत्सव आपल्याला साजरे करता आले नाहीत. मात्र या वर्षी उत्साहाने गणपती साजरा करायच्या तयारीत आहेत. मात्र कोणाला त्रास होणार नाही आणि लवकर मिरवणुका संपतील याची देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. सगळे निमय पाळून उत्सव आपल्याला मोठा करायचा आहे.
गणेश मंडळांसाठी काही निर्णय घेण्यात आले. त्या मंडपाचं शुल्क माफ केलं आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना परवानग्यांसाठी फार त्रास होऊ नये यासाठी स्वतंत्र खिडकीचं नियोजन, ऑनलाईनसुद्धा परवानगी याचा समावेश आहे. त्यामुळे गणेश मंडळांना त्रास होणार नाही याचीदेखील काळजी घेण्याचं योग्य नियोजन केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यात गणेशोत्सवात दोन दिवस मिरवणुका सुरु असतात. या मिरवणुकांना निर्बंध येणार नाही याची सगळ्या गणेश मंडळांनी घ्या. भरपूर प्रमाणात गणपती असल्याने वेळ लागतो मात्र सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार मिरवणुका करा, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना दिल्या आहेत.
दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली आपण गणेशोत्सव साजरा केला मात्र कोरोना अजून संपला नाही. गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. त्यामुळे कोरोनाची देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या सगळ्याचं गणेशमंडळांनी पालन करुन धुमधड्याक्यात गणेशोत्सव साजरा करावा. केंद्र सरकारने कोरोनाचा बुस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी गणेश मंडळांनी देखील त्यात पुढाकार घ्यायला हवा. कोरोना काळात देखील गणेश मंडळांनी चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांनी यात देखील सहकार्य करावं, अशा सुचना देखील त्यांनी दिल्या.