Killari Earthquake : किल्लारीच्या भूकंपात कुटुंब गमावलं,पण हार मानली नाही; भैरव लोहटकर यांचा थक्क करणारा प्रवास
Killari Earthquake : किल्लारी भूकंपात कुटुंबातील आठ लोकं गेली, न हरता, न थांबता किल्लारी ते IIT बॉम्बेपर्यंतचा भैरव लोहटकर यांचा अंगावर काटा आणणारा प्रवासाविषयी जाणून घेऊया.
पुणे : किल्लारी (Killari) भूकंपाला आज तीस वर्ष पूर्ण झाली. मात्र या भूकंपाच्या (Earthquake) आठवणी, भूकंपाचा थरार आणि जखमा आजही ओल्या आहे. हजारो लोकं दगावली, जनावरं गेली आणि हजारो कुटुंब उध्वस्त झाली. यातच वयाच्या सहाव्या वर्षी उमरग्याचे भैरव लोहटकर यांनी सर्व कुटुंब गमावलं. त्यानंतर भूकंपग्रस्त मुलांसोबत पुण्यात शिक्षण घेतलं. त्या भूकंपाच्या सगळ्या विदारक आठवणी विसरण्यासाठी त्यांनी अभिनव महाविद्यालयातून कलेचं शिक्षण घेतलं. पुढे कम्प्युटरचा कोर्स केला आणि आज ते IIT बॉम्बेमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत आहे. गमावण्यासारखं काही नाही आता सगळं कमवायचं आहे, असं भैरव लोहटकर सांगतात.
1993 ची 'ती' सकाळ कशी होती?
पाणावलेल्या डोळ्यांनी भैरव लोहटकर सांगतात की, 'ती सकाळ भयानक होती. आजही ती सकाळ आठवली की अंगावर काटा येतो. मी सहावीत होतो. वसतीगृहात शिकत होतो. गणपती विसर्जन संपवून आजीने मला त्याच रात्री अभ्यासासाठी वसतीगृहात पाठवलं होतं. रात्री दमून आम्ही सगळे वसतीगृहातील विद्यार्थी झोपलो होतो आणि रात्री साडे तीनच्या सुमारास धक्के जाणवले. त्यानंतर आम्ही सगळे खडबडून जागे झालो. नेमकं काय होतंय, याची कल्पनाच नव्हती. मात्र हा भूकंप असू शकतो, असं वाटलं. कारण भूकंप कसा येतो, त्याची कंपणं कशी जाणवतात, याची थोडीफार कल्पना होती. मात्र काहीच वेळात आम्ही सगळे खोलीतील एका भींतीवर जाऊन धडकलो.'
'त्यानंतर खोलीतून बाहेर पडून बघितलं तर मोठ्या गाड्यांच्या रांगा दिसल्या. सगळीकडे भूकंप आल्याची बातमी पसरली. काही दिवसांपूर्वीच माझ्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने आम्हा चार भावंडांना आजी आजोबा सांभाळ करण्यासाठी घेऊन आले होते. विसर्जन करुन तेदेखील झोपले होते. मात्र आपल्याच गावात भूकंप आल्याचं समजलं आणि एका क्षणात भीतीदायक वातावरण निर्माण झालं. आपल्या आई वडिलांनंतर उरलेलं कुटुंब या परिस्थितीत कसं असेल, जिवंत असेल की नाही, याबाबत दर मिनिटाला शंका येत होती. तीन दिवस घरातले जीवंत आहे का? हे कळलं नव्हतं.', असा थरारक अनुभव भैरव लोहटकरांंनी सांगितला.
'तो दिवस कधीच विसरु शकत नाही'
'भूकंपाला तीन दिवस उलटून गेले होते. ज्यांच्या कुटुंबातील लोकं वाचली होती, ती लोकं त्यांच्या मुलांना घेण्यासाठी येत होती. त्यावेळी मी देखील माझ्या कुटुंबियांची वाट बघत होतो. मात्र गावातून आलेल्या एका माणसाने मला घरातील सगळेच दगावल्याची बातमी दिली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मी पोरका झालो होतो. मला शेवटपर्यंत कोणीच घ्यायला आलं नाही. शेवटी भूकंपग्रस्त मुलांच्या पुनर्वसनासाठी आलेल्यांनी मला मदत केली. तो दिवस मी अजूनही विसरु शकत नाही, असं भैरव लोहटकरांनी सांगितलं.
'भारतीय जैन संघटनेचा यशात मोठा वाटा...'
किल्लारी आणि बाकी 52 खेड्यांमध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी भैरव सारखीच अनेक मुलं अनाथ झाली होती. संपूर्ण गावच उद्ध्वस्त झालं होतं त्यामुळे शाळाही जमीनदोस्त झाली होती. या गावातील मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न त्यावेळी उभा राहिला. याच वेळी सगळी सेवा पुरवण्यासाठी शांतीलाल मुथा यांच्या भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते गावात आले होते. सगळ्या गावकऱ्यांची सेवा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. देशभरातून असे अनेक संघटनेचे कार्यकर्ते प्रत्येक गावात उपस्थित होते. त्यावेळी भारतीय जैन संघटनेने गावातील मुलांच्या पालकांची संमती घेऊन गावातील मुलांना पुण्यात शिक्षणासाठी आणलं आणि तिथून या भूकंपग्रस्त मुलांच्या शिक्षणाला सुरुवात झाली.
1000 लोकसंख्येच्या गावातील 700 हून अधिक लोक दगावले...
राजेगाव हे भैरव यांचं आजोळ होतं. त्या गावातील लोकसंख्या 1000 होती. त्यातले 600 ते 700 लोकं या भूकंपात दगावले होते. त्यामुळे भैरव यांच्यासोबत आलेल्या 1500 विद्यार्थ्यांनी मानसिक आधारच गमावला होता. त्यानंतर या भारतीय जैन संस्थेने पदवीपर्यंतचं शिक्षण या सगळ्या मुलांना दिलं. आज या संस्थेमुळे अनेक मुलं आपल्या पायावर उभे आहेत.
याच संस्थेत शिकलेली काही मुलं अजूनही वेगवेगळ्या शहरात काम करतात. मात्र ज्यांचे पालक या भूकंपात वाचले त्यांना अजूनही गावाची ओढ आहे. या 1500 विद्यार्थ्यांपैकी काही मुलं किल्लारीत परत गेले. त्यांनी गावात व्यवसाय करण्याचा किंवा शेती करण्याचा निर्णय घेतला. गावात जाऊन त्यांनी त्यांचं आयुष्य नव्याने सुरु केलं. तर बाकी मुलांनी उच्च शिक्षण घेत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली आहे.
अभिनव महाविद्यालय ते IIT Bombay प्रवास...
पदवी घेऊन वसतीगृहातून भैरव बाहेर पडले. मात्र भूकंपाच्या आठवणी काही विसरता येत नव्हत्या. त्यावेळी त्यांनी मन रमवण्यासाठी कलेचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कलेचं शिक्षण पूर्ण करता करता अनेक ठिकाणी शिकवायला सुरुवात केली. त्यातून पैसे मिळू लागले आणि पुढचे मार्ग सोपे होत गेले. कमवा आणि शिका या योजनेअंतर्गतही त्यांनी काम केलं. त्याच काळात त्यांना कम्प्युटर ग्राफिक्स या विषयाची माहिती मिळाली. त्यावेळी या ग्राफिक्सच्या कोर्सची फी प्रचंड महाग होती. परिस्थिती गंभीर त्यात पाठिशी भरभक्कम पाठिंबा नसल्याने त्यांनी सीडॅकच्या कोर्सची तयारी सुरु केली. हाच कोर्स करण्यासाठी त्यांना मुंबई गाठावं लागलं.
त्यांनी धीरानं पुणे सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईतील सीडॅक कोर्सला प्रवेश घेतला. हाच कोर्स करत असताना त्यांची देशातील एका मोठ्या प्रोजेक्टसाठी निवड झाली आणि आय़ुष्यच बदललं. IIT Bombay मध्ये मोठमोठे रिसर्च केले जातात. भारत सरकारला कोणता मोठा प्रोजेक्ट करायचा असेल तर ते IIT Bombay च्या प्राध्यापकांशी संपर्क करुन त्या प्रोजेक्टवर काम करतात.
या कोर्समधून IIT Bombay मधील आकाश प्रोजेक्टसाठी भैरव यांची 2008 साली निवड झाली. या प्रोजेक्टचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिकेटर दिपक पाठक होते. ते कम्प्युटर विश्वातील नावाजलेले प्राध्यापक आहेत. त्यांनी भैरवची या प्रोजेक्टसाठी निवड केली. राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आकाश टॅब्लेटने मोठी कामगिरी केली. त्याचं शिक्षण सोपं केलं. त्यावेळी या प्रोजेक्टचा भैरव महत्वाचा भाग होते. याच प्रोजेक्टसाठी आणि कम्प्युटर क्षेत्रातील कार्यासाठी दिपक पाठक यांना 2013-14 साली पद्धश्री पुरस्कार मिळाला.
स्वप्न काय आहे?
भैरव यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणावर काम करायचं आहे. त्यांचे वेगवेगळे शैक्षणिक प्रोजक्ट सुरु आहे. येत्या काळात शैक्षणिक धोरणं आणि बदलतं रुप यावर त्यांना काम करायचं आहे. सोबतच त्यांच्या आलेली परिस्थिती कोणावर येऊ नये, यासाठी ते प्रत्यत्न करत आहेत. गावातील मुलांनादेखील ते मार्गदर्शन करतात.