(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Koregaon Bhima : कोरेगाव भीमासंदर्भात 100 हून अधिक वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट; पोलीस कठोर कारवाई करणार
Koregaon Bhima : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या 100 हून अधिक सोशल मीडिया पोस्ट शोधून काढल्या आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली
Koregaon Bhima : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या 100 हून अधिक सोशल मीडिया (Social Media) पोस्ट शोधून काढल्या आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस अंकित गोयल (IPS Ankit Goyal) यांनी दिली आहे. सोशल मीडिया पेट्रोलिंग आणि मॉनिटरिंगचा भाग म्हणून आम्ही कोरेगाव-भीमा (BHima koregaon) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व सोशल मीडिया पोस्ट चेक करण्याल आल्या आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने 100 हून अधिक पोस्ट आम्ही शोधल्या आहेत. यासंदर्भातील सगळी माहिती संबंधित पोलिस स्टेशनला दिली आहे आणि अशा पोस्ट डिलीट करण्याची तातडीने कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सोशल मीडिया हँडलवर अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात नोटीस जारी केली आहे आणि त्यांना अशा पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास अशा लोकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचंही गोयल यांनी सांगितली. सोशल मीडिया आणि मेसेंजर अॅप्सवर कोणतीही खोटी, बदनामीकारक किंवा सांप्रदायिक फूट पाडणारी माहिती किंवा मेसेज पाठवल्यास ग्रुप अॅडमिन आणि असे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार आहे आणि त्या लोकांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई
त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक या समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असणार आहे. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध असणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही अनेकांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत. त्यांच्यावर पोलीसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
अनुयायांसोबत नेत्यांनीही केलं अभिवादन
कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमाइथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. प्रकाश आंबेडकर , केंद्रीय मंत्री रामदास आठवले अभिवादनासाठी आले होते. तर शाई फेकीची धमकी आल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी घरीच बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.