Pune Politics: पुण्यात राजकीय भूकंप? पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या बालेकिल्याला सुरूंग लावलेला अन् शिंदे कनेक्शन असलेल्या त्या नेत्याचं व्हाट्सअप स्टेटस चर्चेत
Pune Politics: गळ्यात भगवा परिधान करुन स्वत:चा फोटो स्टेटसला ठेवत नेत्याने या स्टेटसला 'शाह का रुतबा' हे गाणं ठेवलं आहे. पुण्यातील राजकीय वर्तुळामध्ये या व्हाट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा आहे.

Pune Politics: राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या बदलाचे संकेत दिसून येत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या तयारीला सुरूवात केली आहे. निवडणुकीसाठी नियुक्त्या बैठका, चर्चांना सुरूवात झाल्याचं चित्र आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत मोठ्या अपयशानंतर आता काँग्रेस पक्षामध्ये बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. नाना पटोले यांच्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्तीनंतर आता आगामी निवडणुकीसाठी पक्षात तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे. अशातच पुणे शहर काँग्रेसमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये सात विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक नेमण्यात आले असून ही काँग्रेसची महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. या नेमणुकीमध्ये कसबा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे न देता अभय छाजेड यांच्यावर सोपवण्यात आली आहे, त्यानंतर आता काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावल्यानंतर रवींद्र धंगेकर यांचं स्वकीयांना डिवचणारं स्टेट्स ठेवल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, तर या फोटोमुळे धंगेकर शिंदे गटात जाणार का अशाही चर्चा सुरू आहेत.
धंगेकरांच्या व्हाट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा
रवींद्र धंगेकरांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसची सध्या जोरदास चर्चा आहे. गळ्यात भगवा परिधान करुन स्वत:चा फोटो स्टेटसला ठेवत धंगेकरांनी या स्टेटसला 'शाह का रुतबा' हे गाणं ठेवलं आहे. पुण्यातील राजकीय वर्तुळामध्ये धंगेकरांच्या व्हाट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा आहे. "तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी... तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही" हे गाणं स्टेट्स ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना सूचित इशारा दिल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावल्यानंतर रवींद्र धंगेकर यांचं स्वकीयांना डिवचणारं स्टेट्स असल्याचंही बोललं जात आहे. नुकतच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आलेल्या रवींद्र धंगेकर यांनी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे धंगेकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
रवींद्र धंगेकरांना डावलल्याने चर्चांना उधाण
पुण्यातील शिवाजीनगर, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा या विधानसभा मतदारसंघात निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक पदी पक्षाकडून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. वडगाव शेरीची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कोथरूडची जबाबदारी सुनील शिंदे, शिवाजीनगरची जबाबदारी माजी आमदार रमेश बागवे यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे, पर्वतीची जबाबदारी माजी नगरसेवक संजय बालगुडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात निरीक्षक पदी माजी आमदार दीप्ती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हडपसरसाठी सुनील यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, अशातच कसबा मतदारसंघाची जबाबदारी ही पक्षातील नेते आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे विद्यमान सरचिटणीस अभय छाजेड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना डाववल्याच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर धंगेकर शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्याने त्यांच्यावर जबाबादारी सोपवली नाही का? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश?
पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, रविंद्र धंगेकरांनी या संदर्भात स्पष्टीकरण देत आपण काँग्रेस पक्षात असल्याचं सांगितलं होतं. आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसून मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे, असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं होतं. तसेच आपण वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, असंही रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, आज त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे ते काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामागील कारण म्हणजे या स्टेटसमध्ये धंगेकरांच्या गळ्यात भगवं कापड असून त्यांनी स्टेटससाठी सूचक गाणं निवडलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

