Pahalgam Attack: रुपाली ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, एबीपीसोबत बोलताना सांगितली भयावह परिस्थिती, सरकारकडे केली महत्त्वाची विनंती
Pahalgam Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला झाला आहे, यामध्ये राज्यातील एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान रूपाली ठोंबरे देखील जम्मू काश्मीरमध्ये आहेत. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना तेथील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे देखील जम्मू काश्मीरला गेल्या होत्या. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत, अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात येण्याची तत्काळ सोय करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
याठिकाणी काम करणारा स्टाफमध्ये अनेक मुस्लीम बांधव
रूपाली ठोंबरे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मी दोन दिवसांपूर्वी श्रीनगरला आले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी मी जाऊन आली आहे. सर्वजण खूप घाबरलेले आहेत. नाशिकचेही काही पर्यटक आमच्यासोबत आहेत. आम्ही सुरक्षित आहोत. मात्र, आम्हाला इथून निघण्यासाठी आम्हाला विमान असणं गरजेचं आहे. तो प्रकार घडला त्याठिकाणी काल आम्ही जाऊन आलो आहोत. त्या ठिकाणची परिस्थिती आणि ज्याच्यांवर हल्ला झाला त्यांच्या परिस्थितीचा आम्ही विचारही करू शकत नाही. इथे हल्ला झाला हे जरी असलं तरी याठिकाणी काम करणारा स्टाफमध्ये अनेक मुस्लीम बांधव आहेत. आम्हाला एका आदील नावाच्या व्यक्तीने मोठी मदत केली. ते आजही आमची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. माझी सरकारकडे विनंती आहे की, तुम्हाला जी कारवाई करायची आहे, ती करा पण पर्यटकांना त्यांच्या घरी तातडीने पोहचवण्याची तयारी करा. इथे परिस्थीती बिकट आहे. अनेक लहान मुले आमच्यासोबत आहेत. ते सेफ नाहीत. मी माझ्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून विमानाची सोय करून द्या अशी विनंती केली आहे. तातडीने सर्व मदत करून द्यावी, पर्यटकांना लवकरत लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे, असंही ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
हा हल्ला झाल्यानंतर तिथील परिसर रिकामा करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर परिसरात जंगल आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी वरती जंगलातून जावं लागतं, आणि वरून खाली येण्यासाठी घोड्यावरून खाली येण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे गोळी लागलेल्यांना लवकरात लवकर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्या ठिकाणी सैनिक देखील नव्हते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सुरक्षा नव्हती. त्याठिकाणी दोन ते तीन हजार पर्यटक होते. मोठ्या प्रमाणावर आताही हे पर्यटक घाबरले आहेत. त्यांना लवकरात लवकर घरी सुरक्षित पाठवावं असंही रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इथले पर्यटक 80 ते 90 टक्के आहेत. ते इथे अडकून पडले आहेत. प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांना तातडीने सुरक्षितरित्या आपआपल्या राज्यात नेण्यासाठीची विमानसेवा उपलब्ध करुन द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी व्हिडिओ केला शेअर
मी माझ्या सर्व कुटुंबासह श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो. आजचा हल्ला झाल्यानंतर इथले सर्वजण प्रचंड घाबरलेले आहेत. काही पर्यटक आजच आलेले आहेत. काही जणांच्या परवा आणि त्यानंतरच्या फ्लाइट्स आहेत. त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे की इथे जे पर्यटक अडकून पडले आहेत त्यांना तात्काळ येण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. कारण इथे प्रचंड घबराट पसरली आहे. सर्व पर्यटक आपल्या लहान मुलांसोबत फिरायला आले होते, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल























