Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पुण्यातील दोन जिवलग मित्र काश्मीर ट्रीपला गेले, पण पेहलगाममध्ये दहशतवाद्यांनी क्रूरतेने संपवलं; काकूंनी टाहो फोडला
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: कौस्तुभ गणबोटे यांच्या काकूंशी एबीपी माझाने संवाद साधला त्यावेळी त्यांना ते फिरण्यासाठी तिकडे गेल्याचं माहिती नव्हतं पण हल्ला झाल्यानंतर त्यांच्या सूनेने त्यांना त्याबाबतची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, मृतदेह संध्याकाळी पुण्यात आणणार असल्याची माहिती आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. या घटनेमध्ये पुण्यातील दोन जिवलग मित्रांचा कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर कौस्तुभ गणबोटे यांच्या काकूंशी एबीपी माझाने संवाद साधला त्यावेळी त्यांना ते फिरण्यासाठी तिकडे गेल्याचं माहिती नव्हतं पण हल्ला झाल्यानंतर त्यांच्या सूनेने त्यांना त्याबाबतची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आमचा त्यांच्यासोबत काहीही संपर्क झालेला नव्हता. मला तो फिरायला गेला आहे आणि त्याच्यावरती हल्ला झाला हे माझ्या मोठ्या सूनेने सांगितलं. घरातील कोणाचाही त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कौस्तुभच्या बायकोचा फोन आला होता. तो सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा. तो घरी आला होता, तेव्हा मी जाणार आहे फिरायला तिकडे असं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, मी आता नाहीये इकडं तेवढंच बोलला. कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी सुरक्षित आहे, आम्हाला कोणीच काही सांगत नव्हतं नेमकं काय झालंय. आम्ही नवरा बायको असतो, त्यामुळे घरातील कोणीच आम्हाला सांगत नव्हते, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघे खूप जवळचे मित्र होते. त्या दोघांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे देखील आम्हाला मुलासारखा होता. घरातील सदस्यासारखा होता,असंही कौस्तुभ गणबोटे यांच्या काकूंनी यावेळी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मृतांचा आकडा आता 6 वर
पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मधील दिलीप दिसले यांचा देखील मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मृतांचा आकडा आता 6 वर गेला आहे. परिणामी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला असून आता पर्यंत 26 निष्पाप लोकांच्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
काय असू शकतात हल्ल्यामागचे हेतू?
1. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्सचा भारत दौरा
- आम्ही कधीही काहीही करु शकतो हा हल्ल्याद्वारे अमेरिकेला इशारा
- व्हान्स यांच्यासाठी अमेरिकेचे सी-१७ ग्लोबमास्टर विमाने
- अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांवर एक प्रकारे मात करण्याचा प्रयत्न
2. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा
- काश्मिरचा वाद मिटला नाही हा भारत-सौदी अरेबियाला संदेश
- मित्र देश सौदी अरेबिया भारताच्या जवळ जातोय हे पाकिस्तानला खटकले
- सौदी अरेबिया पाकला भीक देईना,भारतासोबत मात्र अब्जावधींचे करार
3. काश्मीरमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ
- 'काश्मिरमध्ये सर्व सुरळीत होतंय' हे वास्तव मोडण्याचा प्रयत्न
- यंदा साडे तीन महिन्यांत 2.35 कोटी पर्यटकांची भेट
- 2023ला 2.11 कोटी तर 2022 मध्ये 1.88 कोटी पर्यटकांची भेट
- पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न
4. आगामी अमरनाथ यात्रेला इशारा
- अमरनाथ यात्रा पहलगाममधूनच सुरू होते
- यंदा 3 जुलैपासून यात्रा, यात्रेची सध्या तयारी
- यात्रेकरुंच्या मनात भीती निर्माण करण्याचा हेतू
5. पाकच्या लष्करप्रमुखांच्या बोलण्यातून संकेत
-लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले,काश्मीर म्हणजे गाझा
- मुनीर म्हणाले, हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांचे,रीति रिवाज,संस्कृती,विचार वेगळे
- मुनीर म्हणाले, पाकसाठी पूर्वजांनी बलिदान दिले,त्याचे रक्षण करणे आम्हास ठाऊक
- मुनीर म्हणाले, काश्मीर आमच्या गळ्याची नस होती,आहे आणि असेल
























