Chandrashekhar Bawankule: जगदीश मुळीक चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; वडगाव शेरीबाबत चर्चेची शक्यता, पवार गट मित्रपक्षासाठी जागा सोडणार?
Chandrashekhar Bawankule: भाजपचे पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
पुणे: विधानसभेच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. अशातच आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील पक्षांकडून सुरू आहेत. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या होत्या. तर काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे शहरातील उमेदवारांच्या गाठी भेटी घेतल्या. अशातच भाजपचे पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
जगदीश मुळीक वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे आणि सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत. आता ही जागा भाजपाला सोडावी अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असतानाच जगदीश मुळीक या मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला आले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
महायुतीतील जागावाटपावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 90 टक्के जागेवर एकमत झालं आहे, बाकी लवकरच होईल आहे. दिल्लीला जाहीरनाम्यासाठी जात आहे, केंद्र आणि राज्य सरकार हे जनतेकरता काम करणार आहे. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन चांगले काम करेल. महाविकास आघाडी राज्याचा बट्ट्याभोळ करेल, असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आमच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. उमेदवारी कोणाला द्यायची, हा निर्णय सर्वस्वी संसदीय मंडळाचा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची उमेदवार यादी लवकरच जाहीर होईल, पण केव्हा हे मी सांगू शकत नाही. महायुतीत ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे काम सर्वजण करतील. निवडणुकीत आम्ही गुणवत्ता आणि निवडून येण्याच्या निकषांवर उमेदवारी देतो. महायुतीमध्ये ‘नंबर गेम’ राहिला नाही. त्यामुळे आम्ही जागावाटपात अडलेलो नाही. ज्या मतदारसंघात ज्या मित्र पक्षातला उमेदवार जिंकू शकतो, तिथे तडजोड करून उमेदवार निश्चित करू. महायुतीत उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.