छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पुस्तकात अपमानजनक उल्लेख
राजे शिवराय प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, समस्त हिंदू आघाडी, शिवरुद्र प्रतिष्ठान या संघटनांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : संभाजी महाराज हे दारुच्या कैफात आणि कलुशाच्या जाळ्यात अडकले होते, असा उल्लेख सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात असून, त्यावर संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला आहे. दरम्यान, या पुस्तकाच्या लेखिका डॉ. शुभा साठे आणि पुस्तकाची प्रकाशन संस्था लाखे प्रकाशनने माफी मागितली आहे. सर्व शिक्षा अभियानातील समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे.
सर्व शिक्षा अभियानात 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकाच्या 18 व्या पानावर संभाजी महाराजांविषयी हा अपमानजनक उल्लेख आहे. 'रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले', असा उल्लेख या पुस्तकात आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनाबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापणाऱ्या पुस्तकाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांची पोलिसांत धाव घेतली आहे. राजे शिवराय प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, समस्त हिंदू आघाडी, शिवरुद्र प्रतिष्ठान या संघटनांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी, पुस्तकाला सर्व शिक्षा अभियानातून त्वरित वगळण्यात यावे आणि लेखक व प्रकाशकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे.