दारुसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार
हत्येवेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या 10 वर्षीय मुलीने हा सगळा प्रकार पाहिला आहे. हत्येनंतर आरोपी उत्तम जाधवने तेथून पळ काढला आहे.
पिंपरी चिंचवड : दारुच्या व्यसनापोटी पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. घरामध्ये उपस्थित असलेल्या मुलीच्या डोळ्यासमोर हा सगळा प्रकार घडला. वंदना जाधव असं मृत महिलेचे नाव आहे, तर उत्तम जाधव असं आरोपी पतीचं नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार आहे.
वंदना जाधव घरकाम करुन घर चालवत होती. तर उत्तम जाधवला दारुचं व्यसन असल्याने तो नेहमी नशेत असायचा. दारुच्या नशेत तो नेहमी पत्नी आणि मुलांना मारहाण करत असे. बुधवारी दुपारी उत्तमने पत्नी वंदनाकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र वंदानाने पैसे देण्यास नकार दिला.
उत्तमने बुधवारी रात्री पुन्हा एकदा वंदनाकडे पैशांची मागणी केली. मात्र पुन्हा वंदनाने नकार दिल्याने दोघांत भांडण सुरु झालं. भांडणादरम्यान उत्तमने रागाच्या भरात वायरने वंदनाचा गळा आवळून तिची हत्या केली.
हत्येवेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या 10 वर्षीय मुलीने हा सगळा प्रकार पाहिला आहे. हत्येनंतर आरोपी उत्तम जाधवने तेथून पळ काढला आहे. सांगवी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.