Pune Crime News: शिक्षणाच्या माहेरघरात चाललंय काय? कॉलेजपुढे दारुची जंगी जाहिरात करणं पडलं महागात; हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
लोणी काळभोर येथील एका हॉटेल व्यावसायिकाने लोणी काळभोर परिसरातील एका खाजगी विद्यापीठाच्या गेटवर “अमर्यादित दारू दोन तास 799 रुपयांना” अशी जाहिरात करून खुलेआम दारू विक्री सुरू केली
Pune Crime News: लोणी काळभोर येथील एका हॉटेल व्यावसायिकाने लोणी काळभोर परिसरातील एका खाजगी विद्यापीठाच्या गेटवर “अमर्यादित दारू दोन तास 799 रुपयांना” अशी जाहिरात करून खुलेआम दारू विक्री सुरू केली आहे. लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित खासगी विद्यापीठाच्या गेटवर ही जाहिरात नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनीही तातडीने कारवाई करत कदमवाकवस्ती परिसरातील ‘द टिप्सी टेल्स हॉटेल’ या हॉटेलच्या व्यवस्थापकावर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
देवीप्रसाद सुभाष शेट्टी असे व्यवस्थापकाचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप भीमराव क्षीरसागर यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. लोणी स्टेशन परिसरात द टिप्सी टेल्स नावाचे हॉटेल असून ते देवीप्रसाद सुभाष शेट्टी चालवतात. काही दिवसांपूर्वी आपल्या हॉटेलचा दारूचा व्यवसाय वाढवण्यासाठी शेट्टी यांनी लोणी काळभोर येथील एका मोठ्या खाजगी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दोन तासांसाठी 799 रुपयात अमर्यादित दारू मिळेल, अशी जाहिरात करून दारूविक्री सुरू केली होती.
शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून 100 मीटरच्या आत दारूविक्रीवर बंदी असतानाही शेट्टी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खुलेआम दारूविक्री करत होते. याबाबत स्थानिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेट्टी यांनी स्थानिक गुंडांच्या मदतीने नागरिकांचा आवाज बंद केला. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये जाऊन शेट्टीविरोधात गुन्हा दाखल केला.
पुण्यातील अनेक खासगी विद्यापीठाच्या परिसरात अनेक गोष्टींना बंदी आहे. यांनी केलेल्या जाहिरांतीमुळे विद्यार्थांना नशेकडे आकर्षिक होतील त्याच्या आहारी जातील त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिरातींवर लगेच बंदी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. शिक्षणाच्या माहेरघरात नक्की काय चाललंय असा प्रश्न आता अनेकांना पडू लागला आहे. आजची तरुण पिढी वाया जाताना दिसते आहे असं अनेकांचं मत आहे. मात्र व्यवसायिकांनीच अशा प्रकारची जाहिरात केल्यावर नेमका दोष कोणाला द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.