Pune Rain : पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज; मावळ, भीमाशंकर परिसरात 200 मिमीच्या वर पावसाची नोंद
पुणे शहर परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील घाटमाथा परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे. तर पुणे शहर परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील घाटमाथा परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यात(Pune Rain) पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्याने पुणे(Pune Rain) जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. आज (रविवारी) पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे.
आज(रविवारी) जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संततधारपणे पडणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना मॉन्सूनच्या सरींची अनुभूती मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुणे(Pune Rain) जिल्ह्यातील भोर, वेल्हा या भागात 100 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे.
या भागात रात्रभर पाऊस
भोर तालुक्यातील शिरगावमध्ये 121 मिलिमीटर, हिरडोशी 120 मिलिमीटर, भूतोंडे 166 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. वेल्हा तालुक्यात वेल्हा 128 मिलिमीटर, गिसर 135 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालूक्यातील उजनी खंडाळा 235 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भीमाशंकर चासकमान भागात ही 208 मिलिमीटर पाऊस बरसला आहे.
पवना धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी
पवना धरण परिसरात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे एका दिवसांत पाणी पातळीमध्ये 3.94 इतकी वाढ झाली आहे. आज रविवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे. पवना धरण परिसरात काल दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 662 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 655 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी 30.75 टक्के इतकी होती.
आज राज्याच्या या भागात मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगर परिसरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहर परिसरासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, रायगड, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी
मुसळदार पाऊस(Rain)आणि हिरवा निसर्ग पाहण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी लोणावळ्यात(Lonavala)पर्यटकांचा ओघ वाढला आहे. शहर परिसरात असलेले धबधबे आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. विक एंडला या भागामध्ये मोठ्या पर्यटक येत असतात. मुसळधार पाऊस असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.