पुणे पोलिसांचा पळपुटेपणा पुढे आणणाऱ्या 'त्या' चोरट्यांना बेड्या!
पुण्यात ज्या चोरट्यांना पाहून दोन पोलिसांनी पोबारा केला होता, त्यांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. 28 डिसेंबरला चतुश्रुंगी हद्दीत घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेमुळे पोलीस पळपुटे आहेत, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.
पुणे : पुण्यात ज्या चोरट्यांना पाहून पोलिसांनी पोबारा केला होता, त्याच चोरट्यांच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. मुळात हे चोरटेच पोलिसांना घाबरले होते, म्हणून त्यांनी आरडाओरडा केला होता. पण या गोंधळात चोरट्यांना घाबरुन पोलिसांनाच पळ काढला होता. 28 डिसेंबरला चतुश्रुंगी हद्दीत घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेमुळे पोलीस पळपुटे आहेत, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यामुळे पोबारा केलेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याची वेळ पुणे पोलिसांवर आली. ही घटना पोलिसांची प्रतिमा मलीन करणारी होती. म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पोलिसांच्याच कार्यक्रमात याबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. असला पळपुटेपणा दुर्दैवी असल्याचं पवारांनी नमूद केलं होतं. त्यामुळे या चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर होतं. अखेर त्या चौघांपैकी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्यात. बिरजू सिंग दुधानी, सनी सिंग दुधानी यांना आता तर आधी बिंतू सिंग कल्याणी असे तिघे अटकेत आहेत. चौथा मात्र अद्याप ही फरार आहे. आता अटक करण्यात आलेल्या दोघांवर एकूण 77 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सात गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा नंबर तीनला यश आलं आहे.
चोरट्यांना पाहून पोलिसांनी कसा पळ काढला होता पुण्यातल्या औंध परिसरातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये 28 डिसेंबरच्या मध्यरात्री चोर शिरले होते. त्यांनी बंद केलेल्या चार फ्लॅटचे कुलूप तोडले आणि पाचव्या फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सुरु असताना नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन करुन घटनास्थळी येण्याची विनंती केली. यावेळी काही मिनिटात पोलीस सोसायटी बाहेर दाखल झाले होते. त्यांच्यासमोर चारही आले, आता पोलीस त्या चौघांना रंगेहाथ बेड्या ठोकणार असंच काहीसं चित्र तिथे निर्माण झालं होतं, मात्र घडलं ते विपरितच. पोलिसांना पाहून चोरट्यांनी घाबरणे अपेक्षित होतं, पण पोलिसच चोरट्यांना घाबरले आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला.
आता हा पळपुटेपणा वरिष्ठांना कळायचा नाही असा समज या दोघांचा होता. पण ही घटना सीसीटीव्ही दृश्याने समाजासमोर आणली. बघता बघता ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. चोरट्यांना अटक करण्याऐवजी पोलिसांनी पोबारा केल्याचं पाहून सोशल मीडियावर पुणे पोलिसांचं हसं झालं होतं. अगदी गृहविभागाला देखील धारेवर धरण्यात आलं. पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. म्हणूनच कर्तव्य करत असताना केलेला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि भित्रेपणामुळे त्या दोघांवर कारवाई करण्याचे ठरले. त्यानुसार हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलीस नाईक अनिल दत्तू अवघडे या दोघांचं निलंबन करण्यात आलं.