पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाला अटक, चापट मारल्याने केली एकाची हत्या
पिंपरी चिंचवडमधील दत्ता फुगे हा सोन्याच्या शर्टमुळे गोल्डमॅन म्हणून प्रचलित होता. जुलै 2016 मध्ये त्याची हत्या झाली. तर आज त्याच्या मुलाला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
पिंपरी चिंचवड : गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. चापट मारल्याचा रागातून त्याने एकाची हत्या केली आहे. शुभम फुगे असं त्याचं नाव आहे. अमन डांगळे नावाच्या व्यक्तीवर शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या केली. सुरुवातीला वेगळं कारण पुढं आलं होतं. पण तपासाअंती अमनने फक्त चापट मारली, म्हणून शुभमने अल्पवयीन मुलाच्या साथीने ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.
पिंपरी चिंचवडमधील दत्ता फुगे हा सोन्याच्या शर्टमुळे गोल्डमॅन म्हणून प्रचलित होता. पण सोबतीने या ना त्या कारणाने तो नेहमी चर्चेत असायचा. यातूनच जुलै 2016 मध्ये त्याची हत्या झाली. त्यानंतर दत्ता फुगेचे प्रस्थ हळूहळू संपुष्टात आलं. पण आता दत्ता फुगेचा मुलगा शुभम चर्चेत आला आहे. शुभमने अल्पवयीन मुलाच्या साथीने अमनची हत्या केली आहे.
रविवारी शुभम आणि अल्पवयीन मुलगा एका ठिकाणी दारू खरेदी करायला आले. तिथंच अमन देखील आला होता. इथं दारू खरेदी करताना अमन आणि शुभममध्ये वाद झाले. तेव्हा अमनने शुभमला चापट मारली. शुभम आणि अमनची थोडीफार तोंड ओळख होतीच. म्हणून गोड बोलून शुभम आणि अल्पवयीन मुलगा अमनला एका ठिकाणी घेऊन गेले. तिथं पुन्हा वादाला तोंड फुटलं. त्यातून अमनने शुभमला आणखी एक चापट मारली. "तू आमच्या भाईला चापट का मारली", असा जाब अल्पवयीन मुलाने विचारला. याच रागाच्या भरात शुभम आणि अल्पवयीन मुलाने त्याच्यावर शस्त्राने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अमनचा मृतदेह भोसरी गावठाण परिसरात सोमवारी सकाळी आढळला होता. भोसरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, तेव्हा पाठीमागे शस्त्राचे वार होते. अमनचा मोबाईल तपासला तेव्हा मध्यरात्री दोन वाजता पत्नी आणि लातूरहून आणखी एकाचा फोन आला होता. त्यामुळे पोलिसांचा तपास या दोघांच्या दिशेने सुरू होता. मात्र तपासात शुभमच्या नावाचा उल्लेख झाला. पोलिसांनी शुभमला याबाबत विचारलं तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसी खाक्या दाखवता त्याने वरचा घटनाक्रम सांगितला. त्यानुसार भोसरी पोलिसांनी शुभम तर अल्पवयीन मुलाला अवघ्या चोवीस तासात ताब्यात घेतले.