Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपामध्ये प्रवेश; चंद्रकांत पाटीलही उपस्थित
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.
Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते. गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'कोथरुड मधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा आज भाजपामध्ये प्रवेश झाला' असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे आज देशातील प्रत्येकाचा भाजपावर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य मिळते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजपामध्ये काम करण्यासाठी इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी श्याम देशपांडे यांचा मुंबईत प्रवेश झाला. आजही स्वाती मोहोळ यांच्या माध्यमातून जो प्रवेश होत आहे, त्यामुळे कोथरुडमधील आजच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
कोण आहे शरद मोहोळ?
शरद मोहोळ यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहे. जुलै 2022मध्ये शरद मोहोळ यांना पुण्यातून आणि पुणे जिल्ह्यातून तडीपारदेखील करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये शरद मोहोळ पोलीस ठाण्यात गेले होते त्यावेळी मुख्यमंत्रीदेखील होते. त्या दोघांचा फोटोदेखील व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. हत्येच्या प्रकरणात येरवडा कारागृहातून जामीनावर आहे आणि तडीपारही आहे. अशा गुंडाच्या पत्नीला भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आहे.
भाजपला गुंडांची गरज?
शरद मोहोळ आणि त्यांच्या टोळीचं वर्चस्व हे पुण्यातील कोथरुड परिसरात आहे. त्यात परिसरात चंद्रकांत पाटील आमदार आहेत. त्यासोबतच मुरलीधर मोहोळ देखील याच परिसरात राहतात. आगामी निवडणुकांसाठी शरद मोहोळ यांची नेत्यांना गरज भासू शकते. यामुळे हा प्रवेश केला गेला असावा, अशा चर्चा आहे. पुण्यातील गुंडांना पाठीशी घालणं आणि त्यांना राजकारणात सक्रिय करणं यामध्ये भाजपदेखील आता मागे नाही आहे, हे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील गजानन मारणे या गुंडाच्या पत्नीला पक्षामध्ये प्रवेश दिला होता. त्यावरुन एकमेकांवर टीका केली होती.