पुण्यात टोळक्याची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून सुनीलला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले आणि फरार झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुणे : गाडीत पेट्रोल टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सहा जणांच्या टोळक्याने तलवारीचा धाक दाखवून या कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मंगळवार 29 जानेवारीची बावधन खुर्द येथील शिंदे पेट्रोल पंपावरही घटना आहे.
सुनिल बनपट्टे असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील वामनराव शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी सागर ओव्हाळ, सुजीत दगडे, गणेश निंबाळकर, ललीत डांगी, विशाल भुंडे आणि ओंकार लिंगे उर्फ सोन्या या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुनिल बनपट्टे बावधन खुर्द येथील शिंदे पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये इंधन भरण्याचे काम करतो. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कामावर असताना सातही आरोपी तेथे पेट्रोल भरण्यासाठी आले होते. यावेळी आरोपींनी ओळीनी न येता सुनील याला दम देत, आम्ही गाववाले आहोत, आमच्या गाडीत पहिले पेट्रोल भरायचे, असं धमकावलं.
यावेळी आरोपी आणि सुनीलमध्ये बाचाबाची झाली. आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून सुनीलला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले आणि फरार झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.