Ganesh Chaturthi 2023: विसर्जन मिरवणुकीत डान्ससाठी मुलं-मुली पाहिजेत, दिवसाला मिळणार तगडी रक्कम, जाहिरातीने वेधलं लक्ष
Ganesh Chaturthi 2023: पुणेकरांचा नादच भारी म्हणातात ना, ते खरंच! गणेश विसर्जनानिमित्त पुण्यातून एक भन्नाट जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, पुणेकर आता चक्क मिरवणुकीत डान्स करणाऱ्यांना भारी रक्कम देऊ करत आहेत.
पुणे: बाप्पा आले अन् बाप्पा निघाले... आता येणार ती म्हणजे, विसर्जन मिरवणुकींची धूम! विसर्जन मिरवणुकीवेळी ढोल-ताशांचा आवाज ऐकताच अनेकांची पावलं थिरकतात. आता बाप्पाच्या मिरवणुकीत नाचायला आवडणाऱ्या अशाच हौशी कलाकरांसाठी पुणेकरांनी (Pune) एक भन्नाट स्किम आणली आहे. पुण्यातील भोसरी (Bhosri) शहरात गणपती विसर्जनात नाचणाऱ्यांना जमवण्याचं काम सुरू आहे, यासंबंधी एक जाहिरात (Advertise) नुकतीच मंडळाने प्रसिद्ध केली आहे, जी सोशल मीडियावरही (Social Media) चांगलीच व्हायरल होत आहे. तुम्हालाही तुमच्या नागीण डान्सची शैली दाखवून पैसे कमवायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी.
'विसर्जन मिरवणुकीत डान्स करणारे हवे'
अवघ्या दोन दिवसांनी यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळं देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्ज आहेत. पुणेरी ढोल-ताशे आणि त्यावर थिरकणारी मंडळी पाहूनच बघणाऱ्यांमध्येही जोश संचारतो. यातच पुण्यातील भोसरी शहरातून एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 'गणपती विसर्जन मिरवणुकीत डान्स करण्यासाठी मुलं-मुली पाहिजेत' या आशयाने ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. डान्स करणाऱ्यांना मोबदला म्हणून ठराविक रक्कमही मिळणार आहे.
विसर्जन मिरवणुकीत नाचा, 300 रुपये मिळवा
केवळ एक दिवस बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डान्स करणारे हवे, अशी जाहिरात पुण्यातील भोसरीतून प्रसिद्ध झाली आहे. 27 सप्टेंबर रोजी भोसरीत बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यासाठी मिरवणुकीत नाचणाऱ्या केवळ 100 मुला-मुलींची गरज आहे. ज्यासाठी प्रत्येक नाचणाऱ्याला 300 रुपये मिळणार आहेत, त्यामुळे तुम्हालाही या संधीचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्ही जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता.
मिरवणुकीत नाचणाऱ्यांसाठी कोणत्या अटी?
आता पुणेकरांनी या जाहिरातीत एक अट देखील घातली आहे आणि ती म्हणजे, बाप्पाच्या मिरवणुकीत नाचणारे मुलं-मुली हे 18 ते 30 वयोगटातील असले पाहिजे. तसेच, संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत डान्स करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही मोबदल्यासह पुणेरी ढोल-ताशांवर नाचायला आवडणार असेल, तर तुम्ही या बाप्पाच्या मंडळाशी संपर्क साधू शकता आणि तुमचं नाव नोंदवू शकता.
गर्दीवर 1,800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
दरम्यान गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीवर 1,800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
हेही वाचा:
पुणेकरांचा नादच खुळा! विसर्जन मिरवणुकीत डान्स करा, 300 रुपये मिळवा; व्हायरल जाहिरातीने वेधलं लक्ष