Nirmala Sitharaman Pune : पुण्यात अर्थमंत्री सीतारामन यांच्या फोटोला फासलं काळं
Nirmala Sitharaman Pune Visit : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या फोटोला काळं फासलं आहे. हा प्रकार पुण्यातील धनकवडीतील अहिल्यादेवी चौकात घडला आहे.
Nirmala Sitaraman Pune: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या फोटोला फासलं काळ आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune) धनकवडीतील (dhankavdi) अहिल्यादेवी चौकात घडला आहे. खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरी निर्मला सीतारमण गेल्या होत्या. बुधवारी निर्मला सीतारमण यांनी आमदार भीमराव तपकीर यांच्या धकनवडीतील घरी मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हा फ्लेक्स लावण्यात आला होता. त्याच फ्लेक्सला अज्ञातांकडून काळं फासण्यात आलं आहे.
खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याच मतदार संघात घडला प्रकार आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आहेत. अनेक बैठका आणि त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात मॅरेथॉन दौरा आहे. 'मिशन बारामती' असं या दौऱ्याला संबोधलं जातं आहे. मात्र बारामतीला भाजप संघटना मजबूत करायला मी बारामतीचा दौरा करत आहे. बारामतीला टार्गेट करायला मी बारामतीत जाणार नाही, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायला हवं, भारतात सगळीकडे आम्ही लक्ष घातलं आहे, फक्त बारामती नाही, असं निर्मया यांनी स्पष्ट केलं होतं.
वारजेत देखील अडवला होता ताफा
महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज वारजे येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या गाडीचा ताफा अडवला. यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात आणि ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
केंद्र सरकारनं जी धोरणं आखली आहेत आणि ती राबवण्याची तयारी करत आहेत. त्याच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्याचा ताफा अडवला आहे. पुण्यात आम आदमी पार्टीने काम, आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपुर्वी आगामी निवडणुकीचे धोरणं आखण्यासाठी त्यांची अतंर्गत बैठकदेखील पार पडली.
स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि विचार परिवार समन्वय यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. ही बैठक धनकवडी येथील छत्रपती शिवराय मंगल कार्यालयात पार पडली. आगामी निवडणुकीचं धोरणं आखण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जाते. यात शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि काही स्वयंसेवक उपस्थित होते. त्यानंतर वारजेमध्ये जाताना आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला.