गणेशोत्सव काळात ऑनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद घ्यावा, पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांचे पुणेकरांना आवाहन
पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
पुणे : मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता. तसेच नागरिकांना,भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते.त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी केलं आहे.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ या मंडळांनी एकत्रित येऊन पुणेकरांना आवाहन केले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी मुख्य मंदिरामध्येच होणार 'दगडूशेठ'चा गणेशोत्सव, ऑगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर
यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी, असेही मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.
समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या 129 वर्षात सलग दुसऱ्या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असून ऑगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.