'आजचा हिंदू समाज सडलेला!', एल्गार परिषदेत शार्जील उस्मानीच्या वक्तव्यानं वादंग
आजचा हिंदू समाज सडलेला, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे, असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी यानं केलं आहे. शार्जिल उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे.
पुणे : आजचा हिंदू समाज सडलेला, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे, असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी यानं केलं आहे. शार्जिल उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे. यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही विकृत मानसिकता असल्याचे म्हटले आहे.
पुण्यात शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शार्जील उस्मान म्हणाला की, आज हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लिम होते, असं त्यानं म्हटलं आहे. त्यानं म्हटलं की, हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करुन हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीन हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत, असं त्यानं म्हटलं आहे.
मुख्यमंंत्र्यांनी कारवाई करावी- प्रवीण दरेकर
या संदर्भात बोलताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शार्जील उस्मानी यांनी केलेलं हे वक्तव्य हे विकृत मानसिकतेतून आलं आहे. त्यांचाच मेंदू सडला आहे, असं दिसतंय. आता या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे हिंदू समाजावर टीका करणाऱ्यावर काय कारवाई करणार हे दाखवून द्यावं ही अपेक्षा आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. दरेकर म्हणाले की, मुस्लिम समाजावर एखादं वक्तव्य झाल्यावर तात्काळ कारवाई केली जाते किंवा भूमिका घेतली जाते, आता हे वक्तव्य आल्यावर या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
कोण आहे शार्जील उस्मानी अलिगड मुस्लिम विद्यापीठात सिटीजन अमेंडमेंट ॲक्टच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. शार्जील उस्मानी हा विद्यार्थी म्हणून त्या मोर्चामध्ये सहभागी झाला होता. हा मोर्चा सुरू असतानाच अलिगड मुस्लिम विद्यापीठात मोठा हिंसाचार झाला आणि त्या हिंसाचाराला जबाबदार धरत विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये शार्जील उस्मानीचा समावेश होता. जुलै महिन्यात न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केलं होतं. शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेसाठी वक्ता म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं.