Pune News : पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानाच्या चार मालमत्ता ईडीकडून जप्त
Pune News : पुण्यातील रोझरी इंटरनॅशनल स्कूल या शिक्षण संस्थेचा संचालक विनय अरहाना याच्या चार मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. यामध्ये रोझरी स्कूलच्या शाळेच्या इमारती आणि मोकळ्या जागांचा समावेश आहे.
Pune News : पुण्यातील (Pune) रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक अरहाना बंधूंच्या चार मालमत्ता अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (ED) जप्त केल्या आहेत. बँकेच्या फसवणूक प्रकरणी विनय आरहाना आणि त्याचा बंधू विवेक आरहाना यांची लष्कर परिसरातील 47 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रोझरी स्कूलच्या शाळेच्या इमारती आणि मोकळ्या जागांचा समावेश आहे. दरम्यान, कॉसमॉस बँकेची (Cosmos Bank) फसवणूक केल्याप्रकरणी ईडीकडून विनय अरहानाला आधीच अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील कॉसमॉस बँकेकडून शाळेच्या साहित्याच्या खरेदीसाठी आणि शाळेच्या इमारतींच्या नुतनीकरणासाठी घेतलेले 21 कोटी रुपयांचे कर्ज विनय अरहानाने बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या इव्हेंटवर खर्च केल्याचं समोर आलं आहे. ही बाब समोर आल्यानंतर कॉसमॉस बँकेकडून विनय अरहाना याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
भरमसाठ फीविरोधात पालकांची आंदोलने
पुण्यातील रोझरी इंटरनॅशनल स्कूल आणि या स्कूलचा संचालक विनय अरहाना कायमच वादात राहिले आहेत. रोझरी स्कूलमधे शिकणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भरमसाठ फी आकारण्याचा आरोप नेहमीच होत आला आहे. पालकांनी त्या विरोधात अनेकदा आंदोलनंही केली आहेत. पण विनय अरहाना याची हायफाय लाईफस्टाईल ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. महागडे इव्हेंट्स, महागड्या गाड्या आणि शानशौकीसाठी विनय अरहाना ओळखला जातो.
46 कोटींचं कर्ज मंजूर 21 कोटी बँकेत जमा
शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करायची आहे आणि शालेय साहित्याची खरेदी करायची आहे, अशी कारणं देत त्याने कॉसमॉस बँकेकडे कर्ज मागितलं. कॉसमॉस बँकेकडून त्याला तब्बल 46 कोटी पन्नास लाख रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं. त्यापैकी 21 कोटी रुपये बँकेने अरहानाने सांगितलेल्या कंपन्यांच्या बँक अकाऊंटमधे जमा केले.
कॉसमॉस बँकेकडून मिळालेलं कर्ज स्वत:च्या खात्यात वळवले
मात्र या कंपन्या बोगस असल्याचं समोर आलं. या बोगस कंपन्याच्या अकाऊंटमध्ये जमा झालेले पैसै विनय अरहानाने पुढे स्वतःच्या अकाऊंटमध्ये वळते केले आणि त्यामधून पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील एका आलिशान हॉटेलमध्ये फॅशन शोचे आयोजन केलं. सोबतच बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या वेगवेगळ्या इव्हेंट्सवरही अरहानाने उधळपट्टी केली.
इतर बँकांकडूनही कर्ज घेतल्याचं समोर
यानंतर कॉसमॉस बँकेकडून अरहानाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. ईडीने त्याला काही दिवसांपूर्वीच अटक केली. कॉसमॉस बँकेबरोबरच पुण्यातील इतरही अनेक बँकांकडून अरहानाने मोठ्या प्रमाणात लोन घेतल्याचं समोर आलं असून त्या लोनचे पैसै अरहानाने कुठे खर्च केले याचा ईडीकडून तपास करण्यात येत आहे. तपासादरम्यान ईडीने विनय अरहानाच्या चार मालमत्ता जप्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :