शहरी नक्षलवाद प्रकरण, डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक अवैध : विशेष न्यायालय
काल न्यायालयाने डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र आज याच न्यायालयाने पुणे पोलिसांनी त्यांना केलेली अटक अवैध असल्याचा निर्णय दिला. डॉ. आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली चार आठवड्यांची मुदत 11 फेब्रुवारीला संपत होती.
पुणे : अर्बन नक्षलवाद प्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक विशेष न्यायालयाने अवैध ठरवली आहे. तसेच तेलतुबंडे यांना तातडीने सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून संरक्षण देताना चार आठवड्यांची मुदत दिली होती. या मुदतीत ते जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात देखील जामिनासाठी अर्ज करु शकत होते. मात्र जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वरच्या कोर्टात जाण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली, ती अटक अवैध आहे, असं पुणे जिल्हा विशेष जिल्हा न्यायाधीश के. डी. वडणे यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाची बाब म्हणजे काल याच न्यायालयाने डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र आज याच न्यायालयाने पुणे पोलिसांनी त्यांना केलेली अटक अवैध असल्याचा निर्णय दिला. डॉ. आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली चार आठवड्यांची मुदत 11 फेब्रुवारीला संपत होती.
डॉ. आनंद तेलतुंबडे काल रात्री मुंबई विमानतळावर पोहोचणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावर आधीच दाखल होत पहाटे साडे तीन वाजता तेलतुंबडेंना अटक के होती. त्यानंतर आज तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.