(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Khedkar: लेकीमुळे बापाच्या बंद झालेल्या चौकशीच्या फाईल्स पुन्हा उघडल्या गेल्या, दिलीप खेडकर एसीबीच्या रडारवर
Pooja Khedkar: दिलीप खेडकर यांच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता असल्याचीही माहिती समोर आली होती. त्याचबरोबर त्यांचं बारामती कनेक्शन देखील समोर आलं होतं.
Pooja Khedkar: वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरसह (Pooja Khedkar) तिचे कुटुंबिय देखील अडचणीत सापडले आहेत. पूजाचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 2014 पासून खुली चौकशी करण्यात येत होती. मात्र दहा वर्षांत ही चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर ॲड. तानाजी गंभीरे यांनी दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध 2018 आणि 2023 मध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र त्यांना दाद मिळाली नाही. अशातच पूजा खेडकरचं आयएएस होणं वादात सापडल्यानंतर दिलीप खेडकर यांची एसीबीकडून नव्याने चौकशी सुरु करण्यात आली आहे.
तानाजी गंभीरे यांच्याकडुन पुणे एसीबीने नव्याने माहिती मागवली. मात्र गंभीरे यांची तक्रार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आणि तिथून अहमदनगर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तपासासाठी पाठवण्यात आली आहे. तानाजी गंभीरे यांनी यावर आक्षेप घेतला आहे आणि एसीबीच्या तपासाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्याचबरोबर दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता असल्याचीही माहिती समोर आली होती. त्याचबरोबर त्यांचं बारामती कनेक्शन देखील समोर आलं होतं. त्यांची बारामती, पुणे जिल्ह्यातील मावळ अशा ठिकाणी जमीन असल्याची माहिती समोर आली होती. त्यांचा देखील पोलिस शोध घेत आहेत.
पूजा खेडकरचे वडील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित
पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित करण्यात आल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं होतं. दिलीप खेडकर (Dilip Khedkar) आणि पत्नी मनोरमा खेडकर या दोघांवरती नागरिकांना बंदूकीचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून दिलीप खेडकर फरार आहेत. तर, मनोरमा खेडकरला पोलिसांनी महाडमधून अटक केली. खेडकर कुटुंबाची मालमत्ता त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याची तक्रारी मिळाल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची चौकशीही सुरू केली आहे.
दिलीप खेडकरांना (Dilip Khedkar) 2018 आणि 2020 मध्ये निलंबनाला सामोरं जावं लागलं होतं. वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये दिलीप खेडकरच्या विरोधात किमान 300 छोट्या व्यावसायिकांनी तक्रार केली होती आणि दिलीप खेडकरवर अनावश्यक त्रास आणि खंडणीचा आरोप केला होता.
बारामतीत जमिनीच्या सातबारावरील नावात दुरुस्ती
पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली होती. आता त्या सातबारावरील नावात दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी दिलीप कोंडिबा खेडकर असा नावात बदल करण्यात आलेला आहे. दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी 14 वर्षांपूर्वी 14 गुंठे जमीन बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे खरेदी केलेली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली होती. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबियांनी (Dilip Khedkar) तसा बोर्ड लाऊन जमीन विकायला काढली आहे. दीड कोट इतकी जमीनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे.
वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्या नावावर जमीन आहे. पण यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. वाघळवाडी येथे असलेल्या खेडकर यांच्या 7/12 वरती नावाची स्पेलिंग दुरुस्ती असा बदल करण्यात आली आहे. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडिबा खेडकर असा नावात बदल करण्यात आला आहे.