रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
Pune : पुण्यातील रिंगरोड पुण्याच्या पुढील 10 वर्षाच्या विकासाला चालना देईल. रिंगरोडसाठी 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून हा मार्ग येत्या 10 वर्षात 1 ते 10 लाख कोटींचे मूल्य तयार करणारा ठरेल.
Devendra Fadnavis in Pune : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था व्हावी लागेल. राज्याच्या ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत मराठा चेंबर्स आणि पुण्यातील औद्योगिक परिसराची मोठी भूमिका राहील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्स्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर पुणे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी एमसीसीएआयचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, मराठा चेंबर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता, नियोजित अध्यक्ष दिपक करंदीकर, एमसीसीएआयचे महासंचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एमएमआरडीए आणि पीएमआरडीए या दोन भागांत मोठा विकास अपेक्षित आहे. पुणे हे औद्योगिक उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथून मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. पुण्याने नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स’ मध्ये ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’च्या रुपात आपले महत्त्वाचे नाव प्राप्त केले आहे. आपल्याला यापेक्षाही अधिक प्रगती करायची आहे.
महाराष्ट्र देशातील स्टार्टअपचे केंद्र आहे आणि पुणे हे महाराष्ट्रातील स्टार्टअपचे प्रमुख केंद्र आहे. देशातील 80 हजारातील 15 हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशातील 100 युनिकॉर्नपैकी 25 युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. राज्यात अशा उद्योगांसाठी आवश्यक औद्योगिक वातावरण निर्माण झाले आहे. या उद्योगाभिमुख वातावरणाला पुढे कसे नेता येईल, याचा विचार व्हावा. आपण उद्योगकेंद्रीत धोरण राबविले तर आपण अधिक पुढे जाऊ शकतो. त्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर द्यावा लागेल.
At @MCCIA_Pune Annual Day 2022, #Pune. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांची वार्षिक सर्व साधारण सभा.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2022
📍Live from Pune https://t.co/G8XQLhoRbc
रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल
पुण्यातील रिंगरोड पुण्याच्या पुढील 10 वर्षाच्या विकासाला चालना देईल. रिंगरोडसाठी 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून हा मार्ग येत्या 10 वर्षात 1 ते 10 लाख कोटींचे मूल्य तयार करणारा ठरेल. हा रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल. या मार्गाच्या भूमी अधिग्रहणासाठी तज्ज्ञांकडून नाविन्यपूर्ण कल्पना आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. पुण्यात मेट्रो रेल्वेच्या दोन टप्प्याचे काम वेगाने पुढे जात आहे. पुण्यातील औद्योगिक वातावरण पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर 100 टक्के विद्युत वाहनाचा किंवा पर्यायी इंधनाचा उपयोग करणारे पहिले शहर व्हावे.
पुरंदर येथे विमानतळासोबत लॉजीस्टिक हब
पुण्याच्या आर्थिक विकासात पुणे विमानतळाचे मोठे योगदान आहे. जगातील प्रमुख देश पुण्याशी जोडले गेले आहेत. पुणे येथून विमानाच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. सद्ध्याचे विमानतळ एका मर्यादेहून अधिक क्षमतेने चालणं शक्य नसल्याने पुण्यासाठी नवे विमानतळ तयार करणे आवश्यक आहे. पुरंदर येथे नवे विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. येथे विमानतळासोबत कार्गो आणि लॉजीस्टिक पार्क उभारण्याचाही विचार करण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळाला पुण्याशी जोडले जाईल, यामुळे पुण्याला त्याचा फायदा होईल.